लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आज आयपीएल साखळी लढत
नवी मुंबई / वृत्तसंस्था
कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल प्ले-ऑफमध्ये धडक मारण्याची आशाअपेक्षा कायम राखण्यासाठी आज (बुधवार दि. 18) होणाऱया आयपीएल साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत मोठा विजय मिळवावा लागेल. 7 पराभव व 6 विजय, अशा कामगिरीसह केकेआरचा संघ सहाव्या स्थानी विराजमान आहे. येथे विजय मिळवण्याबरोबरच अन्य निकाल आपल्याला अनुकूल असावेत, अशी अपेक्षाही केकेआरला ठेवावी लागेल.
लखनौ सुपर जायंट्सचा संघ तिसऱया स्थानी असून 16 गुणांसह त्यांचा एक पाय यापूर्वीच प्ले-ऑफमध्ये आहे. मात्र, उर्वरित तीन जागांसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली असून शेवटच्या मिनिटातील गोंधळ टाळण्यासाठी त्यांना आणखी
एक विजय संपादन करणे क्रमप्राप्त असणार आहे.
दोनवेळचे माजी विजेते केकेआर मागील हंगामात फायनलपर्यंत पोहोचले होते. मात्र, यंदा मधल्या टप्प्यात मागे फेकले गेल्यानंतर मुंबई इंडियन्स व सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मागील दोन लढतीत दमदार कामगिरी साकारत ते पुन्हा एकदा प्ले-ऑफच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकू शकले. हा धडाका कायम राखण्यासाठी त्यांना आज आणखी एक मोठा विजय प्राप्त करुन अन्य निकाल आपल्याला अनुकूल असावेत, अशी अपेक्षा करावी लागेल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ यंदा आंद्रे रसेलच्या अष्टपैलू खेळामुळे बहरात राहिला असून या बळावरच त्यांनी मागील सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 54 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला होता. यंदा पूर्ण हंगामात झगडत राहिलेल्या अजिंक्य रहाणेला दुखापतीमुळे उर्वरित हंगामात खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले असून पॅट कमिन्सही यापूर्वीच बाहेर फेकला गेला आहे. नितीश राणाच्या कामगिरीत अपेक्षित सातत्य राहिलेले नाही. याशिवाय, मागील 3 सामन्यात केकेआरची बॅट किंचीतही तळपलेली नाही.
दुखापतीतून सावरलेल्या उमेश यादव व टीम साऊदी यांनी काटेकोर मारा केला असून रसेलने मागील सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी 3 बळी घेतले होते. याशिवाय, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती यांच्याकडून संघाला आणखी लक्षवेधी माऱयाची अपेक्षा असणार आहे.
संभाव्य संघ
लखनौ सुपर जायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
कोलकाता नाईट रायडर्स ः श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍरॉन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, शेल्डॉन जॅक्सन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
बॉक्स
लखनौसमोर पराभवाची शृंखला खंडित करण्याचे आव्हान
लखनौचा संघ सलग 2 पराभवानंतर येथे मैदानात उतरत असून ही पराभवाची शृंखला खंडित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मागील दोन सामन्यातील खराब फलंदाजी ही या संघाची मुख्य डोकेदुखी आहे. पॉवर प्लेमध्ये अव्वल दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध त्यांचे फलंदाज झगडत आले असून याचा त्यांना मोठा फटका बसत आला आहे. या संघाची फलंदाजी प्रामुख्याने कर्णधार केएल राहुलवर अवलंबून असून 2 शतकांसह त्याने उत्तम योगदान दिले. मागील 3 सामन्यांपासून मात्र तो ही अपेक्षित फटकेबाजी करु शकलेला नाही. सहकारी सलामीवीर क्विटॉन डी कॉक 3 अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरला असला तरी मागील 2 सामन्यात त्याला अनुक्रमे 11 व 7 अशा किरकोळ धावांवर समाधान मानावे लागले आहे. त्या तुलनेत दीपक हुडा बहरात असून युवा क्रिकेटपटू आयुष बदोनी आपण ‘वन मॅच वंडर’ नाही, हे अधोरेखित करण्यासाठी आसुसलेला असेल. लखनौसाठी गोलंदाजीची बाजू कमकुवत ठरत आली असून अष्टपैलू स्टोईनिसचे योगदान त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. अवेश खान व जेसॉन होल्डर यांनी अनुक्रमे 17 व 14 बळी घेतले असले तरी मोहसिन खान मात्र मागील लढतीत महागडा ठरला. फिरकीपटू रवि बिश्नोईने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 2 बळी घेतले. मात्र, लखनौला त्याच्याकडून अधिक भेदक, काटेकोर माऱयाची अपेक्षा असणार आहे