सुपरओव्हरमधील शेवटच्या दोन चेंडूंवर रोहित शर्माचे सलग दोन षटकार
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
रोहित शर्माने सुपरओव्हरमधील शेवटच्या दोन चेंडूंवर लागोपाठ दोन षटकार खेचल्यानंतर भारताने रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब केले आणि याचबरोबर न्यूझीलंडच्या भूमीतील पहिलावहिला टी-20 चषकही थाटात जिंकला.
निर्धारित 20 षटकांच्या लढतीत भारताने 5 गडय़ांच्या बदल्यात 179 धावा केल्यानंतर न्यूझीलंडलाही 6 बाद 179 धावांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने बिनबाद 17 धावा केल्या तर भारताने बिनबाद 20 धावांसह सनसनाटी विजय मिळवला.
सुपरओव्हरमध्ये विजयासाठी 6 चेंडूत 18 धावांची गरज असताना भारताला पहिल्या 4 चेंडूत केवळ 8 धावा करता आल्या होत्या. पण, नंतर उर्वरित 2 चेंडूत 10 धावांचे अशक्यप्राय आव्हान असताना रोहितने पाचवा चेंडू मिडविकेटच्या दिशेने तर सहावा चेंडू लाँगऑफच्या दिशेने षटकारासाठी फटकावत रोमांचक विजय संपादन करुन दिला.
सुपरओव्हरपूर्वी, निर्धारित 20 षटकांच्या लढतीत न्यूझीलंडचे उत्तम वर्चस्व होते. पण, शेवटच्या 4 चेंडूत 2 धावांचे सोपे आव्हान असताना देखील ते शमीच्या चक्रव्युहात फसले आणि हातातोंडाशी आलेला विजयाचा घास त्यांच्याकडून हिसकावून घेतला गेला. शेवटच्या चेंडूवर रॉस टेलर त्रिफळाचीत झाल्यानंतर ही लढत टाय झाली होती.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन 20 षटकांच्या लढतीत 48 चेंडूत 95 धावा व सुपरओव्हरमध्ये 11 धावांची आतषबाजी करत एकाकी लढला. पण, तरीही तो संघाला विजय संपादन करुन देऊ शकला नाही.
रोहित शर्माची फटकेबाजी
प्रारंभी, रोहित शर्माने ऑकलंडमधील फॉर्मच येथेही कायम राखताना 6 चौकार व 3 षटकार खेचले. शिवाय, केएल राहुलसमवेत (19 चेंडूत 27) 89 धावांची दमदार सलामी दिली. न्यूझीलंडने येथे सलग तिसऱयांदा नाणेफेक जिंकली. पण, यावेळी त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. रोहितने 23 चेंडूतच अर्धशतक साजरे केले. यापैकी 27 धावा त्याने बेनेटच्या एकाच षटकात वसूल केल्या होत्या.
केएल राहुल बाद झाल्यानंतर आश्चर्यकारकरित्या शिवम दुबेला (3) तिसऱया स्थानी बढती दिली गेली. पण, ही चाल फारशी फळली नाही. पुढे, रोहित शर्माही बाद झाला. या पडझडीत भारताने 3 षटकात केवळ 7 धावांच्या बदल्यात 3 फलंदाज गमावले. नंतर कर्णधार विराट कोहली (27 चेंडूत 38) व श्रेयस अय्यर (16 चेंडूत 17) यांनी चौथ्या गडय़ासाठी 46 धावा जमवत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अय्यर व कोहली बाद झाल्यानंतर मनीष पांडे (नाबाद 14) व जडेजा (नाबाद 10) यांनी भारताला 179 धावांचा टप्पा सर करुन दिला होता.
धावफलक
रोहित शर्मा झे. साऊदी, गो. बेनेट 65 (40 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), केएल राहुल झे. मुन्रो, गो. ग्रँडहोम 27 (19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शिवम दुबे झे. सोधी, गो. बेनेट 3 (7 चेंडू), विराट कोहली झे. साऊदी, गो. बेनेट 38 (27 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), श्रेयस अय्यर यष्टीचीत सेफर्ट, गो. सॅन्टनर 17 (16 चेंडूत 1 षटकार), मनीष पांडे नाबाद 14 (6 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 10 (5 चेंडूत 1 षटकार). अवांतर 5. एकूण 20 षटकात 5 बाद 179.
गडी बाद होण्याचा क्रम
1-89 (केएल राहुल, 8.6), 2-94 (रोहित, 10.4), 3-96 (शिवम दुबे, 10.6), 4-142 (श्रेयस अय्यर, 16.6), 5-160 (विराट, 18.5).
गोलंदाजी
टीम साऊदी 4-0-39-0, बेनेट 4-0-54-3, कग्लेईन 2-0-10-0. सॅन्टनर 4-0-37-1, ईश सोधी 4-0-23-0, कॉलिन डे ग्रँडहोम 2-0-13-1.
न्यूझीलंड : मार्टिन गप्टील झे. बदली खेळाडू (सॅमसन), गो. शार्दुल 31 (21 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), कॉलिन मुन्रो यष्टीचीत राहुल, गो. जडेजा 14 (16 चेंडूत 2 चौकार), केन विल्यम्सन झे. राहुल, गो. शमी 95 (48 चेंडूत 8 चौकार, 6 षटकार), मिशेल सॅन्टनर त्रि. गो. चहल 9 (11 चेंडूत 1 चौकार), कॉलिन डे ग्रँडहोम झे. दुबे, गो. शार्दुल 5 (12 चेंडू), रॉस टेलर त्रि. गो. शमी 17 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), टीम सेफर्ट नाबाद 0 (2 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात 6 बाद 179.
गडी बाद होण्याचा क्रम
1-47 (गप्टील, 5.4), 2-52 (मुन्रो, 6.2), 3-88 (सॅन्टनर, 10.4), 4-137 (ग्रँडहोम, 15.6), 5-178 (विल्यम्सन, 19.3), 6-179 (रॉस टेलर, 19.6).
गोलंदाजी
शार्दुल ठाकुर 3-0-21-2, मोहम्मद शमी 4-0-32-2, जसप्रित बुमराह 4-0-45-0, यजुवेंद्र चहल 4-0-36-1, रविंद्र जडेजा 4-0-23-1, शिवम दुबे 1-0-14-0.
पुन्हा सुपर ओव्हर, पुन्हा न्यूझीलंड पराभूत!
केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाची बुधवारी पुन्हा एकदा ‘युद्धात जिंकले व तहात हरले’, अशी स्थिती झाली. गतवर्षी जुलैमध्ये इंग्लिश भूमीत संपन्न झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने रोमांचक खेळ साकारत इंग्लंडविरुद्ध सामना टाय केला होता. पण, नंतर सुपरओव्हरमध्ये ते शेवटच्या क्षणी हरले होते. बुधवारी भारताविरुद्ध तिसऱया टी-20 लढतीतही याचीच पुनरावृत्ती झाली. येथेही न्यूझीलंडला पुन्हा सुपरओव्हरमध्ये लढावे लागले आणि पुन्हा ते पराभूत देखील झाले!
20 षटकांच्या लढतीवर दृष्टिक्षेप
संघ / 5 षटके / 10 षटके / 15 षटके ./ 20 षटके
भारत / 0-42 / 1-92 / 3-127 / 5-179
न्यूझीलंड / 0-43 / 2-79 / 3-128 / 6-179
सुपरओव्हरमध्ये काय घडले?
चेंडू / न्यूझीलंड फलंदाजी / भारत फलंदाजी
पहिला चेंडू / विल्यम्सनची एकेरी धाव (0-1)/ रोहितच्या दुहेरी धावा (0-2)
दुसरा चेंडू / गप्टीलची एकेरी धाव (0-2)/ रोहितची एकेरी धाव (0-3)
तिसरा चेंडू / विल्यम्सनचा स्क्वेअरलेगकडे षटकार (0-8) / राहुलचा फाईनलेगकडे चौकार (0-7)
चौथा चेंडू / विल्यम्सनचा मिडऑफवरुन चौकार (0-12) / राहुलची लाँगऑनकडे एकेरी धाव (0-8)
पाचवा चेंडू / विल्यम्सनची एकेरी अवांतर धाव (0-13) / रोहितचा मिडविकेटकडे षटकार (0-14)
सहावा चेंडू / गप्टीलचा डीप मिडविकेटकडे चौकार (0-17) / रोहितचा लाँगऑफकडे षटकार (0-20).
शमीच्या गोलंदाजीवर रॉस टेलरचा त्रिफळा आणि सामना टाय!
निर्धारित लढतीत न्यूझीलंडला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना विराट कोहलीने शमीकडे चेंडू सोपवला आणि शमीनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. वास्तविक, या षटकातील पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरने डीप मिडविकेटच्या दिशेने जबरदस्त षटकार खेचला व यामुळे उर्वरित 5 चेंडूत 3 धावा, असे सोपे समीकरण यजमान संघासमोर होते. पण, दुसऱया चेंडूवर टेलरला एकेरी धाव घेता आली आणि तिसऱया चेंडूवर विल्यम्सन यष्टीमागे राहुलकडे झेल देत बाद झाला. उर्वरित 3 चेंडूत फक्त 2 धावांची गरज असताना सेफर्टने चौथा चेंडू निर्धाव घालवला व पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. यानंतर शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव आवश्यक असताना शमीने रॉस टेलरचा त्रिफळा उडवला व सामना रोमांचकरित्या टाय झाला!
निर्धारित लढतीत रोहित, सुपरओव्हरमध्येही रोहित!
मर्यादित षटकांच्या लढतीतील सुपरहिरो रोहित शर्माने बुधवारी येथील तिसऱया टी-20 लढतीत आपले नाणे आणखी एकदा खणखणीत वाजवून दाखवले. प्रारंभी, 20 षटकांच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना त्याने 40 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह सर्वाधिक 65 धावा झोडपल्या. ही लढत टाय झाल्यानंतर सुपरओव्हरचा अवलंब झाला आणि तेथेही पुन्हा एकदा रोहितचाच डंका वाजला. रोहितने त्यात 4 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 15 धावांचे योगदान दिले व त्याच्या शेवटच्या दोन चेंडूतील दोन षटकारांमुळेच भारताने ऐतिहासिक मालिकाविजय संपादन केला.