वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू झुबेर हामझाने निर्बंधित उत्तेजक द्रव्य घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्वतःहून निलंबन स्वीकारले असल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने बुधवारी सांगितले.
26 वर्षीय हामझाने 6 कसोटी व एक वनडे सामना खेळला आहे. 17 जानेवारी रोजी आयसीसीने घेतलेल्या उत्तेजक चाचणीत त्याच्या नमुन्यामध्ये फुरोसेमाईड हे द्रव्य आढळून आले. हे औषध मूत्रवर्धक असून उच्च रक्तदाब आणि पाण्याचा अंश वाढल्याने शरीरात आलेल्या सुजेवर त्याचा वापर केला जातो. वाडाने हे औषध निर्बंधित केले असून इतर उत्तेजक घेतल्यास हे औषध त्याला झाकोळून टाकते. यासाठी वाडाने त्यावर बंदी घातली आहे. ‘झुबेर आयसीसीला पूर्ण सहकार्य करीत असून त्याने चाचणीला कोणतेही आव्हान दिलेले नाही. शिवाय त्याने स्वतःहून निलंबन स्वीकारले असून आयसीसीकडे त्याने लेखी स्वरूपात कळविले आहे,’ असे सीएसएने सांगितले.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत हामझाला द.आफ्रिकन संघात स्थान देण्यात आले होते. पण मालिका सुरू होण्याच्या आधी त्याने वैयक्तिक कारणासाठी त्यातून माघार घेतल्याचे कळविले होते.