वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तेजक प्रकरणाची सुनावणी लॉकडाऊनच्या आदेशामुळे ऑनलाईनद्वारे केली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय उत्तेजकविरोधी एजन्सीचे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी बुधवारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
कोव्हिड-19 महामारी संकटाला तोंड देण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. बऱयाच उत्तेजक प्रकरणात आव्हान देणाऱया व्यक्तींची सुनावणी शिस्तबद्धरित्या ऑनलाईनद्वारे शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे नाडाकडून सुनावणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सीच्या शिस्तपालन समिती आणि अँटी डोपिंग अपिल्स पॅनेलसमोर या सुनावणी 8 मे पासून ऑनलाईनद्वारे होणार आहे. नाडाच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सीतर्फे 180 प्रकरणे निकालात काढण्यात आली असून हा विक्रम म्हणावा लागेल. लॉकडाऊनच्या आदेशामुळे नाडाला उत्तेजक चांचणी घेणे अवघड झाले आहे, असेही अगरवाल यांनी सांगितले.