डीआयसीचे उपसंचालक बी. एम. गोटूर यांचे मत : डीआयसी-सीडॉकतर्फे महिलांसाठी खाद्य उत्पादन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
कुटुंबासाठी महिला अनेक वस्तू तयार करतात. परंतु याच वस्तूंना बाजारपेठ मिळाली तर त्यातून उद्योग उभा राहू शकतो व उद्यमशीलता वाढीस लागते. यासाठी डीआयसीतर्फे (जिल्हा औद्योगिक केंद्र) महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे मत सीडॉकचे (सेंटर फॉर एन्ट्ररप्रिनियरशीप डेव्हल्पमेंट) साहाय्यक संचालक बी. एम. गोटूर यांनी व्यक्त केले.
डीआयसी, सीडॉक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी 30 दिवसांचे खाद्य उत्पादन प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. सोमवारी सकाळी केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सहकार्याने सदर संस्थेमध्ये या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केएलई हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे प्राचार्य नंदकुमार, प्रा. नवनीत देशपांडे, ‘फूड माईल्स’ संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. आशिष पार्थसारथी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण शिबिरात प्रात्यक्षिकांसह शिक्षण दिले जाईल. सरकारी योजना, कर्ज सुविधा यासंदर्भातही माहिती दिली जाईल. अनेक तज्ञ प्रशिक्षण देतील, जेणेकरून उद्योग सुरू करणे सोपे जाईल, असेही गोटूर म्हणाले.
प्रा. नंदकुमार यांनी करिअरसाठी अनेक लोक बाहेर जातात. परंतु आपण बेळगावमध्येच उद्योग निर्माण करावा आणि इतरांना काम मिळवून द्यावे, यावर भर देणे आवश्यक असून त्यासाठीच सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाककलेतील नवीन प्रवाह, पदार्थ स्वादिष्ट कसा होईल, अशा सर्व मुद्दय़ांवर प्रशिक्षण दिले जाईल. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन नवनीत देशपांडे यांनी केले. अश्विनी यांनी आभार मानले. आशिष पार्थसारथी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.