बारामतीतील बैठकीत शरद पवार यांच्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
कराड सोसायटी मतदारसंघात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरूध्द उंडाळकरांचे सुपुत्र उदयसिंह पाटील ही लढत राष्ट्रवादीसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे येथे बारकाईने लक्ष ठेवा आणि काम करा, अशी सक्त सूचना शरद पवार यांनी सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना केली. खासदार उदयनराजेंना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्याचा निर्णय तुमच्या स्थानिक पातळीवरचा आहे. त्यावर तुम्हीच एकत्र बसून निर्णय घ्या आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर ती जबाबदारी सोपवा. त्यांचाही निर्णय यामध्ये महत्वाचा ठरणार आहे, असे पवार यांनी सांगितले. बारामतीत झालेल्या या बैठकीत शरद पवारांनी जिल्हा बॅंकेत सावध भूमिका घेण्याची सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना केली.
सातारा येथील बैठक, कार्यकर्ता मेळावा रद्द केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी जिह्यातील प्रमुख नेत्यांची पहिलीच बैठक बारामती येथे घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील हे उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार आहेत आणि कोठे काय होवू शकते, याची सविस्तर माहिती पवार यांनी घेतली. सभापती रामराजेंनी मतदारसंघनिहाय आढावा सांगितला.
सुरवातीला उदयनराजे भोसले यांचा विषय चर्चेला आला. ते गृहनिर्माण व दूधसंस्था मतदारसंघातून रिंगणात आहेत. तेथे काय परिस्थिती आहे, याचीही माहिती घेतली. मात्र, राष्ट्रवादीप्रणित ’सर्वसमावेशक अथवा सर्वपक्षीय पॅनल’मध्ये त्यांना सहभागी करुन घ्यायचे की नाही, असे शरद पवारांना विचारले असता त्यांनी ’हा निर्णय तुमच्या स्थानिक पातळीवरचा आहे. त्यावर तुम्हीच एकत्र बसून निर्णय घ्या आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर ती जबाबदारी सोपवा, असे पवार यांनी सांगितले.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी मंत्री कै. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र ऍड. उदयसिंह पाटील यांच्यातील कराड सोसायटी मतदारसंघात लढत होणार आहे. याबाबतची माहितीही शरद पवार यांनी घेतली. राष्ट्रवादीच्या सर्वपक्षीय पॅनेलच्या विरोधात कोण-कोण प्रभावीपणे लढू शकते, कोण निर्णायक ठरु शकते, सर्वात त्रासदायक कोण असेल, याबाबतचीही माहिती सभापती रामराजेंनी पवार यांना दिली. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजपप्रणित सर्वसमावेशक पॅनलचाही आढावा त्यांनी घेतला. माण सोसायटी मतदारसंघात कशा पद्धतीने लढत होईल, यावर रामराजेंनी सविस्तर सांगितले. जयकुमार गोरे यांच्या विरोधात त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती दिली. दरम्यान, याच बैठकीत पवारांनी ’खटाव’चाही धावता आढावा घेतला.
प्रभाकर घार्गे सोसायटीतून लढणार
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असून आज महिला राखीवमधून इंदिरा प्रभाकर घार्गे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे खटाव सोसायटी मतदारसंघातून प्रभाकर घार्गे व त्यांची पत्नी इंदिरा घार्गे यांचा अर्ज राहिला आहे. मुळात राष्ट्रवादीच्या नेत्यांना इंदिरा घार्गेचा अर्ज महिला राखीव मधूनच हवा होता. पण त्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता खटाव सोसायटीतून प्रभाकर घार्गे सर्व विरोध मोडीत काढून दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार नंदकुमार मोरे यांच्या विरोधात लढणार हे निश्चित झाले आहेत.