जिल्हा बँकेच्या अनुषंगाने तहाची बोलणी?
कधी कोण कोणाचा शत्रू नसतो तसा मित्रही नसतो. त्याचा प्रत्यय साताऱयातील जनतेने वारंवार अनुभवला आहे. एकमेकांच्या जीवावर उठलेले नेते पुन्हा एकेमकांना कधी घास भरवतील हे सांगता येत नाही. त्याचाच प्रत्यय आजही सातारकरांना आला आहे. फलटणचे राजे म्हणजेच विधानपरिषदेचे सभापती रामराजे आणि साताऱयाचे भाजपाचे खासदार उदयनराजे यांच्यात लोणंद येथील सोना अलायंझ कंपनीवरुन ज्या शासकीय विश्रामगृहात विस्तव पेटला होता. दोघांनी एकमेकांच्या विरोधात आरोपाच्या तलवारी उपसल्या होत्या. आता त्याच शासकीय विश्रामगृहाच्या बंद कमऱयात तलवारी म्यॅन करुन जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने कोणता तह दोघांमध्ये झाला याची उत्सुकता साताऱयाच्या प्रजेला लागली आहे. दरम्यान, यावर मीडियाशी बोलताना रामराजे म्हणाले, आमचे पिढय़ान् पिढय़ाचे संबंध जपण्याचे आम्ही काम करतो असे सांगत वेळ मारुन नेली.
प्रत्येकाच्या वाटणीला काय येतंय यावर सगळं ठरणार
यावर उदयनराजे म्हणाले, माझा कोणी शत्रू नाही. मी त्या बरोबरीचा कोणाला समजत नाही. आमच्यात वैचारिक मतभेद असणारच आहेत. माझी बांधिलकी तत्वाशी आहे. तत्वाला धरुन विचार मांडले होते. त्यांच्याशी माझे शत्रुत्व असण्याचे कारण नाही. जिल्हा बँक बिनविरोध होईल, असे वाटते का? माझ्या वाटण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाच्या वाटणीला काय येतंय त्याच्यावर ते ठरणार आहे. माझ्या वाटण्याचा प्रश्न नाही, उदयनराजे कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राजकारण म्हणजे अळवावरच्या पाण्यासारखं आहे. लगेच विरघळून जातं. कोण कोणाचा शत्रू कायम नसतो तर कोण कोणाचा मित्र नसतो हे जनता पाहते. साताऱयाचे खासदार उदयनराजे आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे कधीही जुळले नाही. खरा विस्तव पडला तो लोणंद येथील सोना अलायंझ कंपनीतील कामगार प्रश्नांवरुन साताऱयाच्या शासकीय विश्रामगृहात सुमारे गेल्या चार वर्षापूर्वी भडका उडाला होता. दोन्ही राजेंनी एकमेकांच्या विरोधात आरोपांच्या तलवारी उपसल्या होत्या. फलटणच्या कार्यकर्त्यांनी फलटणमध्ये उदयनराजेंचा त्यावेळी निषेध केला होता तर साताऱयात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी नाक्यावर रामराजेंचा प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन केल्याचे आजही सातारकरांना चांगले आठवते. दोन्ही नेते एकमेकांशी एकाच पक्षात असून कधीही चकार शब्दाने बोलत नव्हते. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उदयनराजे होते तेव्हा ते एकदा राष्ट्रवादी कार्यालयात गेले असताना ते रामराजे होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिले नव्हते. असा विस्तव दोघांमध्ये चांगला फुलला होता. हा विस्तव कधी विजेल दोघांची मने कधी जुळतील हे सांगता येत नव्हते. परंतु गतवर्षी याच शासकीय विश्रामगृहात हे दोन्ही नेते एकत्र भेटले चर्चा झाली अन् बिघडलेले संबंध दूर झाले हे सातारकरांनी पाहिले आहे. त्यानंतर तब्बल एका वर्षानंतर पुन्हा हे दोघे त्याच शासकीय विश्रामगृहात एकत्र आले अन् दोघांची कमराबंद चर्चा झाली.
जिल्हा बँकेच्या अनुषंगाने खलबत्ते
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक दि. 18 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीत राजकीय पक्ष विरहित ही निवडणूक कशी होईल या अनुषंगाने विधानपरिषदेचे सभापती रामराजे यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचकरीता आज अचानक रामराजे नाईक- निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली. त्या भेटमध्ये काय झाले हे मीडियाला समजू शकले नाही परंतु प्रसिद्धी माध्यमांनी जेव्हा रामराजेंना विचारणा केली असता उदयनराजे आणि आमचे पिढय़ांन् पिढय़ाचे संबंध आहेत. ते जपण्यासाठी ही भेट होती. बाकी काही नव्हते असे गाडीत बसताना पत्रकारांना सांगितले.
शिवेंद्रराजेंची नेमकी काय भूमिका राहणार
एका बाजूला रामराजेंच्या जवळ उदयनराजे हे येत आहेत तर दुसऱया बाजूला रामराजेंच्या एका शब्दाच्या पलिकडे शिवेंद्रराजे हे नसतात. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे दोघे जरी एका पक्षात असले तरीही दोघांमध्ये एकमेकांवर आरोपाच्या फैरी सुरु असून या भेटीवर आमदार शिवेंद्रराजेंची नेमकी काय भूमिका राहणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.