पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट ; जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्ते आक्रमक
प्रतिनिधी/ सातारा
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत एकेरी उल्लेख केल्याचे तीव्र पडसाद राजधानी साताऱयात उमटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी एक नेता एक आवाज उदयन महाराज, उदयन महाराज अशा घोषणांनी परिसर जाणून सोडला.
अगोदर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच नुकतेच खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर शिवसन्मान मेळावा घेतला. त्या मेळाव्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत बेताल वक्तव्य थांबता थांबेनात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्याचे समजतात सायंकाळी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक पोवई नाका येथे जमले. त्यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली. तरीही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या तावडीतून पुतळा काढून घेत दहन केले. यावेळी जोरदार घोषणा दिल्या. केंद्रीय मंत्री दानवे यांचा निषेध करण्यात आला. एक नेता एक आवाज, उदयन महाराज, उदयन महाराज अशा घोषणा देत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
खासदार उदयनराजे समर्थक आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बेताल वक्तव्य थांबता थांबेनात. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा जिल्हा राज्यातील सर्वच समर्थक आक्रमक झाल्याचे या घटनेवरून निदर्शनास येत आहे. तसेच खासदार उदयनराजे हे भाजपचे खासदार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपला घरचा आहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी दिलेला आहे, अशी ही चर्चा सुरू झालेले आहे.