चिदंबरम यांच्या भेटीनंतर बाबूश मोन्सेरातच्या विरोधात शेरेबाजी : उदय मडकईकर, टोनीसह रुडॉल्फ फर्नांडिस काँग्रेसच्या वाटेवर
प्रतिनिधी / पणजी
पणजीचे दोन माजी महापौर उदय मडकईकर व टोनी रॉड्रिग्स यांनी काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांची भेट घेऊन पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात शेरेबाजी केल्यामुळे मोन्सेरातना मोठा धक्का बसला आहे. शिवाय मडकईकर यांनी काँग्रेस प्रवेशाची भाषा केल्यामुळे पणजी मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत.
सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनीही चिदंबरम यांची भेट घेऊन काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सांगेतील राजकीय वातावरणही बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मडकईकरांच्या भूमिकेमुळे मोन्सेरातसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मडकईकर यांना पणजी मतदारसंघातून तर रॉड्रिग्स यांना ताळगांवातून आणि गांवकर यांना सांगेतून काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिघेजण लवकरच काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे पक्षीय सूत्रांनी सांगितले. सांताक्रूझ मतदारसंघातून रुडॉल्फ फर्नांडिस यांना चिदंबरम् यांनी ‘आगे बढो’चा संदेश दिला आहे.
मडकईकर, टोनी बाबूशचे खंदे समर्थक
मडकईकर आणि रॉड्रिग्स हे दोन्ही महापौर आधी मोन्सेरात यांचे खंदे समर्थक होते. परंतु आता मोन्सेरात यांनी त्यांना बाजूला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मडकईकर यांनी सांगितले की, मोन्सेरात यांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी आपण रात्रंदिवस झटलो. त्यांच्या विजयासाठी अनेकांनी काम केले. अशा सर्वांना मोन्सेरात यांनी आता बाजूला केले असून त्यांना किंमत राहिलेली नाही. त्यांना आता मोन्सेरात विश्वासात घेत नाहीत. जे विरोधात होते त्यांना आता मोन्सेरात यांनी जवळ केल आहे.
मडकईकरसह त्यांच्या समर्थकांनाही डावलले
पणजी व ताळगांवातील विविध समित्यांवर मडकईकर समर्थकांना स्थान देण्यात आले नसल्याची तक्रारही मडकईकरांनी केली. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी तेथे जाणार असून उमेदवारी मिळणे हा दुय्यम भाग असल्याचे ते म्हणाले.
रुडाल्फ फर्नांडिस यांनीही चिदंबरम यांची भेट घेऊन सांताक्रूझ मतदारसंघासाठी हिरवा कंदील मागितला आणि तो त्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.