प्रतिनिधी /पणजी
मूळचे काँग्रेसमन असलेले पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर लवकरच स्वगृही परतणार आहेत. त्यांच्यासोबत माजी महापौर टोनी रॉड्रिग्स हेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
त्यासाठी दोघांनीही वेगवेगळ्या तारखा निश्चित केल्या असून टोनी हे दि. 3 सप्टेंबर रोजी तर उदय मडकईकर हे आपल्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत दि. 4 रोजी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश करणार आहेत. मडकईकर हे पणजीतून तर टोनी हे ताळगावमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गत सुमारे 19 वर्षांपासून आमदार बाबूश मोन्सेरात यांना साथ दिलेल्या मडकईकर यांनी बाबूश यांच्या कारकिर्दीचा अगदी जवळून अनुभव घेतला. ’जेथे बाबूश तेथे उदय’ असा राजकीय प्रवास त्यांनी केला. त्यातून बाबूश यांच्या स्वभावाचे अनेक गुण त्यांना दिसून आले. बाबुशसाठी कितीही तळमळ आणि निष्ठेने काम केले तरी ते स्वतः तेवढय़ाच निष्ठेने कोणत्याही कार्यकर्त्याशी जवळीक ठेवत नाहीत हेही त्यांना जाणवले. त्यामुळे या वागणुकीला कंटाळूनच मडकईकर यांनी त्यांच्यापासून फारकत घेत काँग्रेसशी जवळीक साधली आहे.