प्रतिनिधी/ चिपळूण
वादग्रस्त ठरलेल्या निळय़ा व लाल पूररेषेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत यांच्या उपस्थितीत मंगळवारी डीबीजे महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यात अचानक बदल करत ती ऑनलाईन घेण्याचा निर्णय झाल्याने व्यापारी, चिपळूण बचाव समितीने या बैठकीवर बहिष्कार टाकला. समोरासमोरच बैठकची मागणी करीत ते आक्रमक झाले. त्यामुळे ही बैठकच रद्द करण्यात आली.
चिपळुणातील निळय़ा, लाल पूररेषेमुळे अख्खे शहर उद्ध्वस्त होणार असल्याने चिपळूण बचाव समिती व व्यापारी आक्रमक झाले आहेत. याची दखल लोकप्रतिनिधींना घ्यावी लागली. यातूनच सामंत यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. सामंत, खासदार विनायक राऊत, विविध विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी 5 वाजता डीबीजे महाविद्यालयात ही बैठक होणार होती. त्याचे लेखी निमत्रंण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी दिले होते. त्यामुळे या बैठकीत काय मुद्दे मांडायचे, याची पूर्ण तयारी चिपळूण बचाव समिती व व्यापारी प्रतिनिधींनी केली होती.
असे असताना सायंकाळी 4.30 वाजता सामंत यांच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधला असता बैठक ऑनलाईन होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आम्ही संपर्क साधल्यावर अचानक केलेला बदल सांगितला जात असेल तर त्यांना या विषयाचे गांभीर्य नसावे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यातूनच या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला कोणीही हजर न राहिल्याने ती रद्द करण्यात आली. असे असले तरी चिपळूण बचाव समितीचे राजेश वाजे, सतीश कदम यांनी ऑनलाईन बैठकीत सहभागी होत सामंत यांच्याकडे समोरासमोर बैठक घेण्याची मागणी केली. यावर सामंत यांनी येत्या 4 ते 5 दिवसांत तुम्हाला अपेक्षित बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.
गंभीर विषयाची चर्चा समोरासमोर असावी
निळय़ा व लाल पूररेषेमुळे बऱयाच अडचणी उभ्या ठाकणार आहेत. हा प्रश्न खूप गंभीर आहे. अशा गंभीर प्रश्नावर ऑनलाईन नव्हे तर समोरासमोर बैठक होणे गरजेचे आहे. या बैठकीला मंत्र्यांसह सर्व विभागांचे अधिकारीही उपस्थित राहणे आवश्यक आहे. अशी बैठक होणार असेल तरच आम्ही ती मान्य करू.
– शिरीष काटकर, चिपळूण