मुंबई/प्रतिनिधी
राज्यात लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. वाढत्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाउनबाबत चाचपणी सुरू असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. तसेच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्यानंही फोन करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान करोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मनसैनिकांना आवाहन केलं आहे.
“महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून केलेल्या संवादात केलं. आपण सर्वांनी सरकारी सूचनाचं पालन करावं. सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे,” असं ट्वीट मनसेनं केलं आहे.