मुंबई \ ऑनलाईन टीम
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधाला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माध्यमांना देखील खरं वाटत नाही की, उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आले म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागील दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र मुख्यमंत्री अवघ्या चार तासांचा दौरा करून मुंबईला परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करायला आलेलो नाही, असा टोला देखील या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्य़ांनी विरोधकांना लगावला आहे.