बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिकेला सर्वांधिक कर हा उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीमधून मिळतो. कर मिळूनही या परिसरात कोणत्याही सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. उद्यमबाग येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून कामगारांना खड्डय़ांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या अंतर्गत रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
बेळगाव शहराचा आर्थिक कणा म्हणून उद्यमबाग औद्योगिक वसाहतीची ओळख आहे. या ठिकाणी लहान – मोठे असे शेकडो कारखाने आहेत. हजारो कामगारांना यामुळे रोजगार मिळाला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये उत्तम सेवा सुविधा पुरविणे आवश्यक आहे. परंतु महानगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींनी आजवर याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. ना पथदीप, ना रस्ते, पिण्याच्या पाण्याचा तर पत्ताच नाही. अशा परिस्थितीतही येथील उद्योग तग धरून आहेत.
दररोज शेकडो वाहनांमधून या ठिकाणी कच्चा माल येतो. तसेच तयार करण्यात आलेले साहित्य बाहेर पाठविण्यात येते. त्यामुळे याठिकाणचे रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. परंतु रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बऱयाच ठिकाणी रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. याकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्यामुळे उद्योग मात्र अडचणीत सापडत आहेत.
लॉकडाऊनमध्ये काम पूर्ण करण्याची मागणी
लॉकडाऊन असल्याने औद्योगिक कारखाने बंद आहेत. यामुळे या काळात ज्या ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत त्यांची डागडुजी केल्यास अन्यथा नवीन केल्यास उपयुक्त ठरणार आहे. वर्दळ बंद असल्याने हे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे यावर लोकप्रतिनिधींनी विचार करून पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण करण्याची मागणी उद्योजक व कामगारांमधून केली जात आहे.