आमराई, महावीर उद्यानात सह्यांची मोहीम; हजारो सांगलीकरांचा पाठिंबा
सांगली : प्रतिनिधी
शहरातील आमराई व महावीर उद्यानात प्रवेश शुल्क आकारण्यास महाराष्ट्र नव निर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. मनसेने गेल्या दोन दिवसात महावीर उद्यान आणि आमराई मध्ये सह्यांची मोहीम राबवली. हजारो सांगलीकरांनी मनसेच्या या मागणीला उस्फुर्त पाठिंबा दिला. दरम्यान महासभेत हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील यांच्यासह मनपा पदाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली.
सावंत म्हणाले, येत्या शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी महापालिकेची महासभा आहे. शहरातील महावीर उद्यान व आमराई मध्ये येणाऱ्या नागरिकांना २ रुपये प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. प्रवेश शुल्काच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा नवा फंडा महापालिकेच्या करभाऱ्यांनी शोधून काढला आहे. या दोन्ही उद्यानामध्ये दररोज हजारो सर्वसामान्य नागरिक येत असतात. कोरोना, महापूर यामुळे सांगलीकर आधीच बेजार झाले आहेत. मनपाचे कारभारी मात्र नागरिकांना कसे लुटता येईल याचे नियोजन करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या प्रस्तावाला विरोध आहे.
मनसेच्या भूमिकेला सर्वसामान्य सांगलीकरांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत सावंत म्हणाले, मनसेच्या वतीने महावीर उद्यान व आमराई मध्ये नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. हजारो नागरिकांनी सह्या करत प्रवेश शुल्क आकारणीस विरोध केला आहे. मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दिला. नागरिकांनी अत्यंत तिखट भाषेत महापालिकेच्या या प्रस्तवाबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना महापौर, उपमहापौर यांच्यासह मनपा पदाधिकारी, आयुक्त यांच्या कानावर घालणार आहे. महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देऊ नये. सांगलीकरांच्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी करणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष संदीप टेंगले, आशिष कोरी, दयांनद मलपे, अमित पाटील आदी उपस्थित होते.