ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली महसुलातील कमी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून हे नवे दर लागू होतील.
राज्यात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊन झाला. या काळात बरेचसे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्य सरकारचे महसुली उत्पन्न कमी झाले. त्यामुळे राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी वित्तविभागाने पेट्रोल- डिझेलवरील मूल्यवर्धित कर वाढवण्याचा निर्णय घेतला.
राज्यात दरमहा सरासरी 11 लाख 66 हजार किलोलिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होते. त्यानुसार 2019-20 मध्ये राज्य सरकारला पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करातून एकूण 24 हजार 900 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. उद्यापासून होणाऱ्या 2 रुपयांच्या करवाढीमुळे राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नात दरमहा 300 कोटींची वाढ होईल.