ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता मुंबई महानगरपालिका आहे. कोरोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक विक्रम केला असून, उद्या (मंगळवारी) पालिकेतील 100 कोटींचा घोटाळा उघड करणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
डोंबवलीत काल झालेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका केली. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप करत आणखी काही नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे म्हटले आहे. कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला आहे. मंत्र्यांच्या परिचित व्यक्ती आणि एक अधिकारी यांच्या कंपनीला मुंबई महापालिकेत कोरोना काळात कशा पद्धतीने 100 कोटींचे कंत्राट मिळाले. हे मंगळवारी जनतेसमोर ठेवणार आहे. तर पुढच्या महिनाभरात एमएमआर क्षेत्रातील महापालिकांमधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांमधील भागीदारीची पाच प्रकरणे लोकांसमोर ठेवणार आहे, असेही सोमय्या म्हणाले.