कमी दरात वीजपुरवठय़ासह दर्जाही राखण्याचे दिले आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमच्या हुबळी येथील व्यवस्थापकीय संचालिका डी. भारती यांनी मंगळवारी बेळगावला भेट दिली. यावेळी बेळगावमधील उद्योजकांनी विजेसंबंधीच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. अनेक भागात अद्याप उत्तम दर्जाचा वीजपुरवठा होत नसल्याने त्याचा फटका उद्योजकांना बसत आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी उद्योजकांनी केली.
यावेळी बोलताना डी. भारती म्हणाल्या, सध्या बेळगावमधील काही उद्योग बाहेरून वीज खरेदी करीत आहेत. परंतु आम्ही उद्योगांना कमी किमतीत वीजपुरवठा करण्यासाठी योजना आखत आहोत. याद्वारे उद्योगांना कमी किमतीत वीजपुरवठा केला जाणार असून विजेचा दर्जाही राखला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी हुबळी येथील टेक्निकल विभागाचे संचालक ए. एच. कांबळे, बेळगाव विभागाचे मुख्य अभियंते नागराज, ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंते प्रवीणकुमार चिकाडे, साहाय्यक कार्यकारी अभियंते अरविंद गदगकर, विनोद करूर, संजीव हम्मण्णावर यांच्यासह हेस्कॉमचे अधिकारी, बेळगाव परिसरातील उद्योजक उपस्थित होते.