लोकेश एच. डी. यांचे आवाहन, फौंड्री उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव हा परिसर फौंड्री तसेच इतर उद्योग निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. येथून दररोज शेकडो टन उत्पादीत माल परदेशात निर्यात केला जातो. परंतु बऱयाच उद्योजकांना निर्यात धोरणाची माहिती नसल्याने ते एखाद्या मध्यस्थाला घेऊन मालाची निर्यात करतात. यामुळे त्यांना राज्य तसेच केंद सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांनी निर्यातीचे धोरण शिकून घेऊन सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेंगळूर येथील डीजीएफटी लोकेश एच. डी. यांनी उद्योजकांना केले आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन, बेळगाव फौंड्री क्लस्टर, द इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमन, डीआयसी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी फौंड्री क्लस्टरच्या सदस्यांना कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निर्यातीविषयी माहिती देताना ते बोलत होते. व्यासपीठावर ईसीजीसीचे साहाय्यक व्यवस्थापक एम. नवाझ खान, मंगळूर येथील कस्टमचे साहाय्यक आयुक्त वासुदेव नाईक, द इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमनचे चेअरमन महेश कुडाळे, एफआयईओच्या साहाय्यक संचालिका डी. एम. दानिशा मिनू यांच्यासह इतर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कर्ज, सरकारच्या योजना, आयात, निर्यात, कर्नाटक सरकारचे 2020-25 चे औद्योगिक धोरण अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महेश कुडाळे यांनी उद्योग क्षेत्राविषयी माहिती दिली. डीआयसीचे संचालक भारत बी. यांनी औद्योगिक धोरण उद्योजकांसमोर मांडले. वासुदेव नाईक यांनी कस्टमचे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्थान याविषयीची माहिती दिली. व्ही. राहुल यांनी कर्जांविषयी माहिती दिली. यावेळी बेळगाव परिसरातील उद्योजक उपस्थित होते.