वृत्तसंस्था/ कटक
रविवारी येथे झालेल्या 75000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ओडिशा खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत 14 वर्षीय उन्नती हुडाने तर पुरूष एकेरीत बिगर मानांकित 21 वर्षीय किरण जॉर्जने अजिंक्यपद पटकाविले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 14 वर्षीय हुडाने दर्जेदार खेळाचे दर्शन घडविताना तोशनीवालचा 21-18, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. बॅडमिंटनची सुपर 100 दर्जाची स्पर्धा जिंकणारी उन्नती हुडा ही सर्वात कमी वयाची बॅडमिंटनपटू ठरली आहे. हुडाने या स्पर्धेत मालविका बनसोडचा उपांत्य सामन्यात पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात बिगर मानांकित किरण जॉर्जने पी.राजवतचा 58 मिनिटाच्या कालावधीत 21-15, 14-21, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत लंकेच्या सचिन डायस आणि थिलीनी एच. ने मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना भारताच्या एम.आर. अर्जुन आणि त्रीशा जॉलीचा 21-16, 22-20 असा पराभव केला.