प्रतिनिधी/ बेळगाव
वार्षिक परीक्षा पार पडल्या की उन्हाळी सुटी पडते. मात्र सध्या कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सुटी देण्यात आली आहे. मात्र शिक्षण विभागाच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार दि. 12 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मार्चच्या पंधरवडय़ापासून सुटीवर असणाऱया विद्यार्थ्यांना हक्काची 2019-2020 या शैक्षणिक वर्षाची उन्हाळी सुटी 12 पासून मिळणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीला 10 एप्रिल रोजी निकाल जाहीर करून उन्हाळी सुटी देण्याचा आदेश बजाविण्यात आला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत निकाल जाहीर होणार नसला तरी उन्हाळी सुटी मिळणार आहे.
कोरोनाबाबत खबरदारी म्हणून 16 मार्चपासून सुटी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेबाबतचा गोंधळदेखील दूर करत परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
2019-2020 या शैक्षणिक वर्षात पूरस्थितीतही विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली होती. सदर सुटीची भरपाई शनिवारी पूर्ण दिवस शाळा घेऊन करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे 250 दिवसांमधून महिन्याचे कामकाज ठप्प झाले आहे. 16 मार्च ते 10 एप्रिलपर्यंतच्या कामकाजाचे दिवस सुटीत गेल्याने शैक्षणिक कामकाज कोलमडले आहे.