नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या 24 तासांच्या कालावधीत देशात कोरोनाचे 26,115 रुग्ण आढळले असून याच कालावधीत 252 जणांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 79.58 कोटी लोकांना कोरोना लसीचा एक तरी डोस देण्यात आला आहे. राज्य सरकारांकडे अद्यापही 5.43 कोटी लसी उपलब्ध आहेत. सध्या मोठय़ा प्रमाणात लसींचे उत्पादन सुरु असून 100 कोटीचे ध्येय निर्धारित कालावधीच्या आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबरपासून कोव्हीशिल्ड लसीची निर्यात सुरु करण्यात येईल, अशी माहिता सिरम कंपनीने दिली आहे. भारत सरकारने निर्यातीला अनुमती दिली आहे. जगात या लसीला मोठी मागणी असून निर्यातीसाठी दबाव वाढत आहे. कोव्हीशिल्ड तसेच कॉव्हॅक्सिन या लसी सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या असल्याने त्यांना गरीब आणि विकसनशील देशांमधून मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले आहे.