रात्रीच्या अहवालात 209 बाधित, 726 जणांची कोरोनावर मात
कोरोनामुक्ती 37 हजारांच्या पार, ‘कृष्णा’ची कोरोनामुक्ती 2500 पार
इनडोअर हॉलमधील खेळ सशर्त सुरु, घोडेसवारी,नौका विहारासाठी परवानगी
टॅक्सी व्यवसायास परवानगी
प्रतिनिधी / सातारा
नवरात्रातील तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गती कमी झाली असून रविवारच्या अहवालात फक्त जिल्ह्यात 145 नवीन बाधित समोर आले आहेत. यापैकी सातारा 49, कोरेगाव 27 या तालुक्यात बाधितांची संख्या अल्प पण वाढ सुरुच आहे. सायंकाळी आलेल्या अहवाल दिलासादायक असून तब्बल 726 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तीने 37 हजारांचा टप्पा ओलांडत कोरोनाविरुध्दच्या लढाईला बळ दिले आहे. एकूण कोरोनामुक्तांची आकडा 37 हजार 308 एवढा झाला असून कोरोनामुक्तीची टक्केवारी 85 टक्केच्या वर गेलीय. तर उपचार्थ रुग्ण संख्या 5 हजारांच्या खाली आली आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर, विविध हॉस्पिटलमधून 726 जणांना घरी सोडण्यात आले. गेल्या 24 तास फक्त 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 209 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे
रविवारी आलेल्या अहवालात खंडाळा, महाबळेश्वर नवे रुग्ण आढळून आले नाहीत. तर हॉटस्पॉट कराडमध्ये फक्त 5 नवे रुग्ण तर पाटण तालुक्यात फक्त 2 नवे रुग्ण समोर आलेत. मात्र, हॉटस्पॉट सातारा 49, कोरेगाव 27 व फलटण 20 या तालुक्यात अल्प पण वाढ सुरुच असली तर कोरोनामुक्तीची टक्केवारी 85 टक्केंच्या वर गेल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु झाली आहे.
‘कृष्णा’ची कोरोनामुक्ती 2500 पार
पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 2500 हून अधिक कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 24 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 2529 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगराणीखाली कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आज हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा 2500 चा टप्पा पार केला.
इनडोअर हॉलमधील खेळ सशर्त सुरु
सातारा जिह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील क्षेत्रांमध्ये क्रिकेट, खो-खो, इ. मैदानी खेळ तसेच ज्या खेळामध्ये सुरिक्षत अंतर राखून खेळता येणारे इनडोअर खेळ उदा. बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग इ. खेळांच्या सरावासाठी काही मार्गदर्शक सूचना व अटींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे. सदर आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी सरावासाठी आवश्यक तेवढ्याच व मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा व सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकार राहील.
प्रवासी टॅक्सी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी
जिल्ह्यातील “काळी पिवळी टॅक्सी” व्यवसाय सुरु करण्यास खालील सूचना व मार्गदर्शक सूचनेस अधिन राहून मान्यता दिली आहे. पर्यटकांची नोंद रजिस्टरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. एका टॅक्सीमध्ये एका वेळी एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. टॅक्सीचालक यांचे बाजूला पर्यटकांना बसण्यास प्रतिबंधन करावा. टॅक्सीचालक प्रवासी यांच्यामध्ये पार्टीशन असणे आवश्यक आहे. टॅक्सीचालक यांनी टॅक्सीमधून प्रवास करणाया प्रवाशांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक फेरीवेळी निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे.
घोडेस्वारी व नौका विहारासाठी परवानगी
जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणीत ”घोडेस्वारी” तसेच महाबळेश्वर येथील “वेण्णा लेक बोट क्लब येथे नौका विहार” पर्यटनाच्या बाबीसाठी खुले करण्यास तसेच व्यवसाय सुरु करण्यास खालील सूचना व मार्गदर्शक सुचनेस अधिन राहुन मान्यता देत आहे. दररोज प्रत्येक पर्यटकांची नोंद नोंद वहीत ठेवणे घोडेस्वारांवर बंधनकारक राहिल. पर्यटक यांनी मास्क, फेस शिल्ड, ग्लोब्ज, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. तिकीट मिळाल्यानंतर सामाजिक अंतर पाळून बोट पर्यटकांना देण्यात यावी. एका बोटीमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा.
जिल्ह्यात8 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या अंबवडे ता. सातारा 65 वर्षीय पुरुष, फत्त्यापूर, ता. सातारा 78 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शेंदूरजणे ता. वाई 63 वर्षीय पुरुष, वाळवा जि. सांगली येथील 42 वर्षीय पुरुष, रहिमतपूर ता. कोरेगाव 65 वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ ता. सातारा 94 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड 57 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले हिंगणगाव ता. कराड 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
453 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा 41, कराड 18, फलटण 19, कोरेगाव 45, वाई 17, खंडाळा 18, रायगाव येथील 45, पानमळेवाडी 38, महाबळेश्वर 10, पाटण 29, दहिवडी 25, तळमावले 30, म्हसवड 29 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 89 असे एकूण 453 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
सोमवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 1,72,213
एकूण बाधित 43,865
एकूण कोरोनामुक्त 37,308
मृत्यू 1,438
उपचारार्थ रुग्ण 5,119
सोमवारी
बाधित 209
मुक्त 726
बळी 08