दहा दिवसांपासून तक्रारी वाढल्या : पाणीपुरवठय़ासाठी एलऍण्डटी कंपनीकडून टँकर तैनात
प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः उपनगरात पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सुरळीत पाणीपुरवठा करण्यास एलऍण्डटी कंपनी अपयशी ठरली आहे. सध्या दहा दिवसांपासून पाणी नसल्याने तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा नसलेल्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी एलऍण्डटी कंपनीकडून टँकरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
चोवीसतास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीमुळे शहरवासियांना पाच दिवसांआड नियमित पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या काही भागात दहा दिवस तर काही भागात पंधरा दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. चोवीसतास पाणीपुरवठा योजनेलादेखील याचा फटका बसला असल्याने संपूर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांना सातत्याने गळती लागत असल्याने शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. शहर आणि उपनगरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
उपनगरात मागील पंधरा दिवसांपासून पाणीसमस्या निर्माण झाली आहे. उपनगरात पंधरा दिवसांपूर्वी पाणीपुरवठा करण्यात आला होता. पण त्यानंतर पाणी पुरवठा झाला नसल्याने रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाणी नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. एलऍण्डटी कंपनीकडे तक्रार केली असता, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
टँकरसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
विशेषतः मे महिन्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पण यंदा मार्च महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील सर्वच भागात पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्याने महापालिकेच्यावतीने दोन टँकर आणि एलऍण्डटी कंपनीने चार टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे. एलऍण्डटी कंपनीच्या तक्रार निवारण केंद्रातील 9986839800 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा झाला नसल्यास या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली.