प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजेंच्या अल्पावधीत जवळ गेलेले सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे नागेवाडी येथे पारेख पेट्रोल पंपाला लागूनच कोडेटेट बॉक्सची कंपनी 54 गुंठय़ामध्ये टाकली गेली आहे. ही कंपनी सुरु करण्याकरता अद्यापही ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही. तोच महावितरण कंपनीकडून त्यांच्यावर तब्बल 12 लाख 85 हजार रुपयांची वीज चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वीज चोरीच्या गुह्यामुळे लोकप्रतिनिधींकडूनही विजेची चोरी केली जात असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीवर राजकीय दबाव आणून परवानगी मिळवण्याची खटपट सुरु असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
सातारा तालुक्यातील नागेवाडीकर अगोदरच दगडखाणीच्या प्रदुषणाने त्रस्त आहेत. त्यातच कोरोना काळात नवउद्योजक येऊ लागले असून त्यांच्याकडून नियमांची पूर्तता न करता उद्योग थाटला जात आहे. असेच साताऱयाचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने नागेवाडी येथे पारेख पेट्रोल पंपाच्या बाजूलाच 54 गुंठे जागा घेतली. तेथे कोडेटेड पुठय़ांची कंपनीकरता काम सुरु केले. नैसर्गिक ओढय़ावर सिमेंटच्या पाईपा टाकून तसेच नागेवाडीतील शेतकऱयांची गुरेवाट बंद करुन त्यांनी कंपाऊंड घालून तेथून रस्ता बंद करत कंपनी सुरु केली. याच कंपनीकरता दि. 24 डिसेंबर 2021 च्या सायंकाळी 5 वाजता कनेक्शन घेतले. त्यामध्ये मीटरमध्ये फेरफार करुन त्यांनी आजपर्यत वीज चोरी केली. तब्बल 12 लाख 85 हजार 630 रुपयांचे वीज बिल भरले नाही. महावितरणचे कनिष्ठ अभियंता गणेश मारुती जाधव हे तेथे पहाणीला गेले असता वीज चोरी केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी दि. 16 जानेवारीला सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याचा तपास सहाय्यक फौजदार बागवान हे करत आहेत. दरम्यान, महावितरणच्या अभियंत्याकडून गुन्हा दाखल होत असताना तो दाखल होऊ नये यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याचीही जोरदार चर्चा सुरु होती.