महिला काँग्रेसची मागणी : पोलीस महासंचालकांना निवेदन सादर
प्रतिनिधी /पणजी
अनेक गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेले पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांना निलंबीत करून त्याच्या विरोधात तपासकाम सुरु करा अशी मागणी महिला काँग्रेसने केली आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईकसह एका शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. लवकरच संबंधीत अधिकाऱयांची बैठक घेऊन योग्य ती कारवाई करणार असे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांनी सांगितले असल्याचे बिना नाईक यांनी सांगितले.
शुक्रवारी संध्याकाळी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यानंतर बिना नाईक पत्रकारांशी बोलत होत्या यावेळी त्यांच्या सोबत युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर व अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात कायदा सुव्यवस्था पुर्णपणे बिघडलेली असून गुन्हेगारी प्रकरणात मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. सरकार केवळ स्वार्थ साधून घेण्यात मग्न आहे. असेही बिना नाईक यांनी सांगितले.
पोलीस खात्यातील अनेक पोलीस अधिकारी चांगले काम करीत आहे. पिंगे सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीस अधिकाऱयांमुळे पेलीस खातेच बदनाम होत आहे म्हणूनच लैंगिक अत्याचार व इतर गुन्हेगारी प्रकरणात सामील असलेल्या या उपनिरीक्षकावर त्वरीत कारवाई होणे गरजेचे आहे. पिंगे याच्या विरोधात विविध पोलीस स्थानकात एफआयआर नोंद झालेले असताना अजून त्याच्या विरोधात कारवाई का होत नाही असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे. उपनिरीक्षकाच्या पदावर असताना पिंगे याच्यावर त्रयस्त कारवाई होणे कठीण आहे. असेही बिना नाईक यांनी सांगितले.