बेंगळूर : उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली आहे. यापुर्वी कारजोळ यांना 23 सप्टेंबर 2020 रोजी कोरोना संसर्ग झाला होता. उपचारानंतर 7 ऑक्टोबर 2020 रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. 4 मार्च 2021 रोजी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती.
सध्या गोविंद कारजोळ रायचूर जिल्हय़ाच्या मस्की विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात गुंतले आहेत. 10 आणि 11 एप्रिल रोजी ते मुख्यमंत्र्यांसमोवत प्रचारात सहभागी होणार होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते दोन दिवसांपासून इस्पितळात उपचार घेत आहेत. कोरोनाची बाधा झाल्याने आपण प्रचारात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. अनुभवी डॉक्टर आपल्यावर उपचार करीत असून आरोग्य सुधारत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. प्रचारात सहभागी होणे शक्य नसल्याने त्यांनी खंतही व्यक्त केली आहे. 17 एप्रिल रोजी मस्की विधानसभा मतदारसंघात मतदान होणार असून भाजपतर्फे प्रतापगौडा पाटील आणि काँग्रेसतर्फे आर. बसवनगौडा तुर्विहाळ रिंगणात आहेत. दोन्ही पक्षातील मातब्बर नेत्यांकडून मस्की मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पोटनिवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे.