ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आज दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ही भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर कारखान्याविषयी असणार आहे.
सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दुपारी 2 वाजता मी जंरडेश्वर साखर कारखान्याशी संबंधित शेतकरी / संस्थापकांसह मुंबई ईडीच्या अधिकाऱ्यांना अजित पवार यांच्या बेनामी भ्रष्ट व्यवहारासाठी भेटणार आहे’. सोमय्या यांच्या या ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. सोमय्या आणि ईडी अधिकाऱ्यांच्या भेटीत काय चर्चा होणार? आणि त्यानंतर या प्रकरणाला काय वळण मिळणार? असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर अजित पवार यांची नेमकी भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.