नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उपहार सिनेमा आग दुर्घटनाप्रकरणी अन्सल ब्रदर्सची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सुशील अन्सल आणि गोपाल अन्सल यांना 8 नोव्हेंबर रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा वरिष्ठ न्यायालयाने कायम ठेवली आहे. 13 जून 1997 रोजी हिंदी चित्रपट बॉर्डरच्या प्रदर्शनादरम्यान लागलेल्या आगीत 59 लोकांचा मृत्यू झाला होता. 2015 मध्ये सत्र न्यायालयाने उपहार सिनेमाचे मालक अन्सल ब्रदर्सला दोषी ठरवले होते.
पटियाला हाऊस न्यायालयाने उपहार सिनेमा आग प्रकरणात 8 ऑक्टोबर रोजी पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी सुशील आणि गोपाल अन्सल बंधूंसह 5 जणांना दोषी ठरवले होते. या प्रकरणात न्यायालयाने अन्सल बंधूंसह न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेशचंद शर्मा, पीपी बत्रा आणि अनूप सिंग यांनाही दोषी ठरवले होते. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक एफआयआर नोंदविण्यात आला होता. यामध्ये आयपीसी कलम 120-बी, 109, 201 आणि 409 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चित्रपटादरम्यानच चित्रपटगृहाच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानंतर ती इतर भागातही पसरली. टॉकीजमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे तपासातून समोर आले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अन्सल बंधूंवर याचिकाकर्त्यांना धमकावून न्यायालयीन कागदपत्रांची छेडछाड केल्याचा आणि न्यायालयीन कर्मचाऱयांशी हातमिळवणी केल्याचा आरोप होता. तपासादरम्यान फाईल्समधून पाने फाडून गायब करण्यात आली होती.