वृत्तसंस्था / हैद्राबाद
अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या उपाध्यक्षपदासाठी प्रमुख प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षक संजय मिश्राने सरचिटणीसपदासाठी आपला अर्ज संघटनेकडे पाठविला आहे.
पी. गोपीचंद हे सध्या प्रमुख बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गोपीचंद सचिवपदासाठी अर्ज भरणार असल्याची चर्चा चालू होती. पण शेवटच्या क्षणी पी. गोपीचंद यांनी सचिवपदाऐवजी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या घटनेनुसार उपाध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार हा मंडळाच्या कार्यकारी समितीचा सदस्य असणे जरुरीचे आहे. दरम्यान, गोपीचंद हे अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या कार्यकारी समितीचे आजपर्यंत सदस्य नाहीत. संघटनेचे अध्यक्ष हेमंता बिस्वा सर्मा हे पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यांची बिनविरोध निवड अपेक्षित आहे. संघटनेच्या विविध पदांसाठी पाठविलेले अर्जदार 19 मार्चपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतात. 25 मार्चला अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेची निवडणूक होणार आहे.