जिल्हय़ातील स्थितीचा जिल्हाधिकाऱयांकडून आढावा : विविध समित्यांना सूचना
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी संबंधित अधिकाऱयांनी वेळेत पार पाडावी. तसेच कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी स्थापन केलेल्या समित्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱया व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हय़ातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक अधिकारी) डॉ. जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सावंत यांच्यासह जिल्हय़ातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध समित्यांची स्थापना केली असून त्यात मनुष्यबळ व्यवस्थापन समिती, गव्हर्नमेंट कोविड हॉस्पिटल, CCedC, DCHC, DCH, बेड व्यवस्थापन समिती, मृतदेह व्यवस्थापन समिती, कोविड हॉस्पिटल व्यवस्थापन समिती, भोजन व्यवस्थापन समिती, गृह अलगीकरण व सर्वेक्षण समिती, कोरोना व्यवस्थापनसंदर्भात अधिग्रहण समिती, रुग्णवाहिका व्यवस्थापन समिती, उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटर (CCedC) व्यवस्थापन समिती, मृत्यूदर (CFR) ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट समिती, निधी व्यवस्थापन समिती अशा समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या समितीमार्फत जिल्हय़ातील कोरोनासाठी लागणाऱया डॉक्टर्स, नर्सेस व इतर मनुष्यबळ यांचे नियोजन करण्यात येणार असून CCedC, DCHC, DCH बेडचे व्यवस्थापन, कोरोनाने मृत्यू पावलेल्या मृतदेहांची स्मशानभूमी विल्हेवाट लावणे, मृतदेहांच्या वाहतुकीसाठी शववाहिका उपलब्ध करणे, कोविड हॉस्पिटलमध्ये पुरेशा औषधांचा पुरवठा तसेच स्वच्छता याबाबत आढावा घेणे. कोविड सेंटरमध्ये देण्यात येणारे भोजन व त्याची गुणवत्ता तसेच पॅकेजिंग याबाबत मार्गदर्शन करणे. त्याचबरोबर ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेचे सर्वेक्षण करणे, गृह अलगीकरणातील रुग्णांना मेडिकल किट देणे, गृहभेटी देणे, तालुकानिहाय कोरोना बाधितांची आकडेवारी अद्ययावत करणे, कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिका, शववाहिका व इतर वाहने उपलब्ध करून देणे, या वाहनांचे दर निश्चित करणे, त्यासाठी टोल फ्री क्रमांक तयार करून 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहेत. यासाठी समितीनिहाय नेमून दिलेल्या जबाबदाऱया संबंधित अधिकाऱयांनी विनाविलंब पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या.