शिरताव आणि वरकुटे मलवडी ग्रामपंचायती मालामाल
गोडोली / प्रतिनिधी :
माण तालुक्यातील शिरतावचा जवळपास ४६ लाख आणि वरकुटे मलवडीचा १ कोटी ९ लाख कर आवदा सौर ऊर्जा प्रकल्पाने मागील ४ वर्षांपासून थकवला होता. ग्रामपंचायतींनी मागणी करून ही कर जमा करण्यात आला नव्हता. त्यामुळे थकबाकी जमा करा, अन्यथा साताऱ्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या दारात उपोषणाचा इशारा दिला होता. यावर प्रशासकीय कार्यवाही सुरु झाली आणि अवघ्या एक महिन्याच्या आत शिरतावला ४६ लाख १६ हजार तर वरकुटे मलवडीला १ कोटी ९ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी जमा झाली. सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा आणि दोन सक्षम अधिकाऱ्यांचा दरारा यामुळे दोन गावच्या ग्रामपंचायती मालामाल झाल्या.
माण तालुक्यातील शिरताव आणि वरकुटे मलवडी गावात आवदा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असून, मागील ४ वर्षात त्यांनी ग्रामपंचायतीला कोणताही कर मागणी करुनही भरला नाही. ही बाब सजग नागरिकांनी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली. यावरून जानेवारी २०२१ पासून गटविकास अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) यांच्याकडे याबाबत माहिती घेऊन ग्रामपंचायतीचा थकबाकी कर वसुल करा नाही तर दि.१५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या दारात उपोषण करणार, असा इशारा दिला होता.
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या समवेत सविस्तर चर्चा करून वसुलीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका घेतली. जिल्हा परिषदेतून माण गटविकास अधिकाऱ्यांना वसुली करा नाही तर कंपन्या सीलबंद करून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी झाले. गटविकास अधिकाऱ्यांनी सुद्धा वसुलीचा तगादा आणि कारवाईची भुमिका घेत ४ वर्षे दाद न देण्याऱ्या आवादा कंपनीला अखेर शिरताव ग्रामपंचायतीची तब्बल ४६ लाख १६ हजार ८९४ रुपये तर वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीची १ कोटी ९ लाख ७९ हजार ९९८ रुपयांची थकबाकी एक रक्कमी भरून घेतली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी अधिनियमाचा आधार घेऊन वसुलीसाठी दाखवलेली तत्परता, सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा, उपोषणाची मात्रा तर माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. बी. पाटील यांच्या पाठपुराव्याच्या दणक्याने दोन्ही ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.