वृत्तसंस्था/ हैदाबाद
3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्कमधील ऍरहस येथे होणाऱया थॉमस आणि उबेर चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता विश्वा शर्मा यांच्या विनंतीवरून सिंधूने उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
27 आणि 28 सप्टेंबर रोजी काही वैयक्तिक कामामुळे पी.व्ही. सिंधुने उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता पण सोमवारी अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षानी सिंधुशी संपर्क साधत तिला या स्पर्धेत सहभागी होण्याची विनंती केली. सिंधुने या विनंतीला मान देवून उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यास होकार दिला. सदर स्पर्धा डेन्मार्कमध्ये खेळविली जाणार असून 17 सप्टेंबरला या स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन संघाची निवड केली जाणार आहे. दरम्यान 29 सप्टेंबरला पी.व्ही. सिंधु डेन्मार्कला रवाना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांना पदके मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. चीन तैपेई, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी या स्पर्धेतून माघार घेतली असून चीनच्या सहभागासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही.