वृत्तसंस्था/ ऍरहस (डेन्मार्क)
येथे सुरू असलेल्या उबेर चषक सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी ब गटातील सलामीच्या लढतीत भारताने स्पेनचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. आता या स्पर्धेत भारताचा पुढील फेरीतील सामना स्कॉटलंडविरुद्ध 12 ऑक्टोबरला तर तिसरा सामना 13 ऑक्टोबर रोजी थायलंडविरुद्ध होणार आहे.
भारत-स्पेन यांच्यातील ब गटातील सलामीच्या लढतीत एकेरीच्या सामन्यात सायना नेहवालला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले. हा एकेरीचा सामना सायना नेहवाल आणि स्पेनची एझुमेंडी यांच्यात खेळविला गेला होता. या लढतीत सायनाला पहिला गेम 20-22 असा गमवावा लागला पण त्यानंतर, वेदना असहय़ झाल्याने सायनाला दुसऱया गेममधून निवृत्त व्हावे लागले.
दुसरा एकेरी सामना भारताची मालविका बनसूद आणि स्पेनची कोरालेस यांच्यात झाला. मालविकाने हा सामना 21-13, 21-15 अशा गेम्समध्ये जिंकला. तिसरा सामना दुहेरीचा खेळविला गेला. या सामन्यात भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि ऋतुपर्णा पांडा या जोडीने स्पेनच्या लोपेझ आणि युसेली यांचा 21-10, 21-8 अशा गेम्समध्ये पराभव करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात भारताच्या आदिती भट्टने स्पेनच्या 18 वर्षीय सिटेनवर 21-16, 21-14 अशा गेम्समध्ये मात केली.
शेवटच्या दुहेरी सामन्यात स्पेनच्या एझुमेंडी आणि कोरालेस या जोडीने भारताच्या अश्विनी पोनाप्पा आणि सीकी रेड्डी यांचा 21-18, 14-21, 21-17 असा पराभव केला.