मतदारांना आवाहन : काकती, होनगा येथे युवा उमेदवारांचा भरणा अधिक
वार्ताहर/ काकती
काकती, होनगा, ग्राम पंचायत निवडणुकीत आजी-माजी उमेदवारांसह युवा उमेदवारही मोठय़ा शर्थीने रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक उमेदवाराने गावच्या सर्वांगीण विकासकार्यासाठी संधी मिळावी अशी मतदार राजापुढे मागणी केली आहे. लोकशाहीची नितीमुल्ये पायदळी तुडवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला आहे. अशा उमेदवारांना बाजूला सारून योग्य उमेदवारांना मतदान करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
काकतीत ग्रा. पंचायतीच्या 37 जागांकरिता 150 उमेदवार रिंगणात असून 17 बुथमधून मतदान होणार आहे. तर होनग्यात 7 बुथमध्ये मतदान होणार असून 27 जागांसाठी 85 उमेदवार रिंगणात आहेत.
कोण निवडून येणार प्रश्नचिन्ह असून, निवडून येण्यासाठी अनेक उमेदवारांनी पडद्यापाठीमागे युवा वर्गाला मटण दारुच्या ओल्या पाटर्य़ा दिलेल्या आहेत. काहीनीं पैसे देऊन मतदान विकत घेण्याचे प्रकार घडले आहेत, असे मतदारातून बोलले जात आहे. राज्य व केंद्र सरकारच्या निधीचा वापर योग्य रितीने करणाऱया कार्यतत्पर उमेदवाराची निवड करणे मतदारराजाच्या हातात आहे.