प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला असून सर्व उमेदवार मतदारांच्या दारात जावून मतांसाठी विनंती करीत आहेत. त्याचवेळी अंतर्गत राजकारण आणि बंद दरवाजाआडच्या बैठका सुरू आहेत. बांधकाम व्यवसायिकांची बैठक घेवून निवडणूकीकरिता मदत निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी द्या अन्यथा कामे होणार नाहीत असा धमकी वजा इशारा देण्यात आला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच उमेदवार भरपूर परिश्रम घेत आहेत. प्रचारा दरम्यान सर्वच उमेदवार घरोघरी जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच मतदान करण्यासाठी विनविण्या करीत आहेत. महापालिका निवडणूकीची लढाई गल्लीतील समस्याबाबत आणि शहराच्या विकासासाठी असते. पण काहीजण ही लढाई प्रतिष्टेची करू पहात आहेत. तसेच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून आणून महापालिकेतील सत्तेची चावी आपल्या हाती ठेवण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी आटापिटा चालविल्या आहेत. याकरिता सर्वसामान्य उमेदवारांवर दबाव टाकण्यासह उमेदवारांमध्ये वाद लावण्याचे प्रकार सुरू आहेत.
निवडणूकीत राजकिय पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी फंडींग करण्याकरिता बांधकाम व्यवसायिकांना लक्ष्य करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना निधी देण्यासाठी प्रयत्न सुरू असून याकरिता इतकी रक्कम द्या अशी मागणी बांधकाम व्यवसायिकांकडे करण्यात आली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. अलिकडे शहरातील बडय़ा बांधकाम व्यवसायिकांची बैठक घेवून त्यांच्यासोबत विविध करार करण्यात आल्याचे समजते. सध्या इमारत बांधकाम परवानगी घेण्यासाठी महापालिका कार्यालयाच्या पायऱया जिझवाव्या लागतात. काहीवेळा अधिकाऱयांना चिरीमिरी द्यावी लागते. तसेच इमारत बांधकाम परवानगी मनपाच्या परवानाधारक अभियंत्यांमार्फत दिला जातो. पण ठराविक संघटनेच्या माध्यमातून गेल्यास इमारत बांधकाम परवानगीकरिता कोणत्याच अधिकाऱयांला पैसे देण्याची गरज नाही. आमच्याकडे पैसे द्या, काय असेल ते आम्ही पाहून घेतो, अशी सुचना बांधकाम व्यवसायिकांना करण्यात आली आहे. तसेच अधिकाऱयांकडून आम्ही कामे करून देवू जर कोणी थेट मनपा कार्यालयात जाईल त्या व्यवसायिकांना इमारत बांधकाम परवाना मिळणार नाही असा इशारा देण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लहान बांधकाम व्यवसायिकांसमोर पेच निर्माण झाला असून बडय़ा रक्कम कशा द्यायच्या असा प्रश्न सर्वसामान्य बांधकाम व्यवसायिकांसमोर निर्माण झाला आहे.
जनतेच्या पैशामधून सर्व विकासकामे होत असतात. बांधकाम व्यवसायिक असो, उद्योजक असो किंवा रस्त्यावर भाजी विकणारे आणि फेरीवाले सर्वच स्थरातील व्यवसायिक कर भरणा करतात. जनता कर भरते, म्हणून प्रशासन विकासकामे राबविते. जनतेच्या कररूपी पैशामधून सर्व विकासकामे राबवित असताना काहीजण आपल्या खिशामधून पैसे खर्च केल्याप्रमाणे मताची याचना करताना आपण स्वखर्चानेच सर्व विकासकामे राबविल्याच्या अविर्भावात असे सांगून मतदारांवर दबाव टाकत आहेत.