@ प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या 58 वॉर्डांमधून 385 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. गुरुवारी दुपारी माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उमेदवारांनी लागलीच प्रचाराला सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांकडे सहकार्याची विनंती करण्यास मतदारांनी सुरुवात केली आहे.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे प्रचारासाठी बंधने लादण्यात आली आहेत. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत निवडणुकीचा प्रचार करावा लागणार आहे. जास्त गर्दी न करता केवळ चार समर्थकांच्या उपस्थितीत प्रचार करण्याची सूचना करण्यात आली आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. त्यामुळे खुला प्रचार करण्यास अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत मोजक्मयाच समर्थकांसह उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह माजी नगरसेवकही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे माजी नगरसेवकांनी यापूर्वी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाचे पत्रक तयार केले आहे. प्रत्येक मतदारांच्या घरी जावून केलेल्या कामाची माहिती देऊन मतदानासाठी याचना करीत आहेत. तसेच गल्लीतील गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव मंडळ व युवक मंडळे, महिला मंडळाच्या पदाधिकाऱयांची भेट घेऊन मतदान करण्यासाठी विनंती करीत आहेत. तसेच जास्तीत जास्त मतदान व्हावे, याकरिता मोर्चेबांधणी सुरू आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी वेळ खूपच कमी देण्यात आला आहे. दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान असून प्रचारासाठी केवळ 7 दिवसांचा वेळ मिळाला आहे. सात दिवसांत सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मीडियाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या शहरात प्रचाराचा आवाज नसला तरी वातावरण निवडणूकमय झाले आहे.