वार्ताहर /पणजी
कुंभारजुवे मतदारसंघातील भाजपची उमेदवारी आपल्याला द्यावी असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगून देखील उमेदवारी दुसऱयाला देण्याचा डाव नेते आखत आहेत. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे भाजपचे युवा कार्यकर्ते रोहन हरमलकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
कुंभारजुवे मतदारसंघात आपण भाजपसाठी कार्य करीत आहे. भाजप नेत्यांनी आपल्याला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे गेले वर्षभर भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू ठेवला. कोविड काळात अनेकांना मदत केली. मतदारसंघातील पंचायतीच्या सरपंच, पंच सदस्यांना विश्वासात घेऊन कार्य पुढे नेत गेलो आहे. असे असताना देखील भाजपने आपले उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही, त्यांच्याच मर्जीतील व्यक्तीला उमेदवारी देणार असल्याची माहिती मिळाल्यावर आपण भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याचे हरमलकर यांनी सांगितले. उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचे सुचविल्यानंतर आपण हा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील 75 टक्के कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्याच पाठिंब्यावर आपण जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी कुंभारजुवे मतदारसंघातील अनेक सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठीत नागरिक, पंच सदस्य उपस्थित होते.