वृत्तसंस्था/ ब्रासिला
येथे सुरू असलेल्या कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात कोलंबियाने उरूग्वेचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हिड ओस्पिना याची कामगिरी दर्जेदार झाली. पेनल्टी शूटआऊटमध्ये त्याने उरूग्वेचे दोन फटके अडवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
कोलंबिया आणि उरूग्वे यांच्यातील हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. निर्धारित 90 मिनिटांच्या कालावधीत गोलफलक कोराच राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. गोलरक्षक डेव्हिड ओस्पिनाचा हा कोलंबिया संघाकडून विक्रमी 112 सामना होता. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. यापूर्वी झालेल्या कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत उरूग्वेला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पेरू संघाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियातर्फे 4 तर उरूग्वेतर्फे 2 गोल नोंदविले गेले. कोलंबिया संघाने 2001 साली कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेतील यजमान ब्राझील आणि पेरू यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तसेच कोलंबियाचा उपांत्य फेरीचा सामना अर्जेंटिना संघाबरोबर होणार आहे. 10 जुलै रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला जाईल.