ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा काही दिवसांपासून रंगू लागली होती. याच पार्श्वभूमीवर समोर आलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती आहे. कलाक्षेत्राच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेच्या संघर्षात उर्मिलाने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळेही उर्मिलाच्या नावाचा शिवसेना विचार करत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारीही दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतरही काँग्रेसने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. पण मला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असे उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याचे समजते.
असे असले तरी उर्मिला मातोंडकर यांचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. मात्र मराठी चेहरा आणि मराठी नाव, तसेच राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य व्यक्ती म्हणून उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचे कळते आहे.