भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ऑनलाईन बैठक – रणजीपटूंना भरपाई, टी-20 विश्वचषकाबद्दलही चर्चा अपेक्षित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्थगित आयपीएल स्पर्धेचा उर्वरित टप्पा निश्चित करण्याकरिता बीसीसीआयची आज (शनिवार दि. 29) महत्त्वाची बैठक होत आहे. दि. 15 सप्टेंबर ते दि. 15 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित केला जाईल, तसेच रणजीपटूंना भरपाई व आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल या बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सौरभ गांगुली असणार आहेत.
नियोजित टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतातच व्हावी, यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी थोडी प्रतीक्षा करावी, अशी विनंती आयसीसीकडे केली जाणार आहे. त्याबद्दल या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
इंग्लिश खेळाडूंचा सहभाग अनिश्चित
उर्वरित आयपीएल टप्प्यात सहभागी होण्यासाठी इंग्लिश खेळाडूंना परवानगी दिली जाणार नाही, असे इंग्लंड क्रिकेट मंडळाचे संचालक ऍश्ले गाईल्स यांनी यापूर्वीच जाहीर केले असून तो मुद्दा कसा हाताळायचा, याबद्दल आम्हाला अध्यक्ष व सचिवांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱयाने या बैठकीच्या पूर्वसंध्येला सांगितले. जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, सॅम करण, इयॉन मॉर्गन, मोईन अली, बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर आदी इंग्लिश खेळाडू विविध प्रँचायझीसाठी महत्त्वाचे आहेत. हे खेळाडू खेळू शकले नाही तर त्यांचे पर्यायी खेळाडू निवडण्याचा कठीण पेच सोडवणे प्रँचायझीसाठी अशक्यप्राय असणार आहे.
न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध मालिका रद्द
भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणे अपेक्षित होते. पण, आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीतच होणार असल्याने या मालिका आता होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. याशिवाय, न्यूझीलंडचा संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर नोव्हेंबरमध्ये भारत दौऱयावर 2 कसोटी सामने खेळण्यासाठी येणार आहे. त्या रुपरेषेत कसा बदल केला जाणार, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
रणजीपटूंना भरपाई
मागील हंगामात कोरोनामुळे रणजी स्पर्धा रद्द करावी लागली, याचा जवळपास 700 वरिष्ठ प्रथमश्रेणी खेळाडूंना फटका सोसावा लागला होता. बीसीसीआयने या खेळाडूंसाठी आर्थिक साहाय्य करण्याचे अभिवचन गतवर्षी जानेवारीत दिले होते. मात्र, त्यावेळी त्याबद्दल विचार झाला नव्हता. आता त्यावर पुन्हा एकदा चर्चा अपेक्षित आहे.