वीज वाचविण्यासाठी टाय घालून ऑफिसात जाऊ नका
वृत्तसंस्था/ मादिद्र
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ हे देशात ऊर्जेची बचत होऊ शकेल अशाप्रकारच्या योजनेला मंजुरी देणार आहेत. या योजनेपूर्वी सांचेझ यांनी लोकांना अजब सल्ला दिला आहे. शर्टवर टाय घालणे बंद करा असे आवाहन सांचेझ यांनी केले आहे. मी केवळ शर्ट परिधान करतोय, अशाचप्रकारे ऑफिसमध्ये जाणाऱया लोकांनी केवळ शर्ट आणि पँट परिधान करण्यावर प्राधान्य द्यावे. याचे अनुकरण केल्यास उष्णतेचा त्रास कमी होईल असे सांचेझ यांनी म्हटले आहे.
मी टाय परिधान केलेला नाही आणि स्वतःच्या मंत्र्यांना देखील टाय वापरू नका असे सांगितल्याचे विधान सांचेझ यांनी केले आहे. एका कार्यक्रमात सांचेझ हे केवळ ब्ल्यू सूट आणि पांढऱया शर्टमध्ये दिसून आले आहेत. सांचेझ यांनी स्वतःच्या स्टाफला देखील टायशिवाय काम करा अशी सूचना केली आहे. टाय परिधान न केल्याने वीज वाचविण्यास काही प्रमाणात योगदान करू शकू असे सांचेझ यांचे मानणे आहे.
सांचेझ यांच्या योजनेचा उद्देश देशात वीज बचत करण्यावर भर देणे आहे. स्पेनसह युरोपमधील काही देश सध्या वीजसंकटाला सामेरे जात आहेत. टाय परिधान न केल्याने वीज कशी वाचणार हे मात्र सांचेझ यांनी स्पष्ट केलेले नाही. देशाच्या पर्यावरण मंत्रालयाने यापूर्वीच एअर कंडिशनर्सचे तापमान 27 अंशावर ठेवण्यास सांगितले आहे. स्पेनमध्ये मागील काही महिन्यांमध्ये विजेचे दर वाढले आहेत. विजेचे हे संकट युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे अधिकच तीव्र झाले आहे.
जपानमधील मोहिमेची पार्श्वभूमी
2011 मध्ये जपानमध्ये एक अशाचप्रकारची मोहीम सुरू केली होती. त्या मोहिमेचे नाव ‘सुपर कूल बिझ’ होते. या मोहिमेत ऑफिसमये जाणारे कर्मचारी शर्ट आणि टायच्या जागी स्वतःच्या पसंतीचे कपडे घालू शकत होते. ब्रिटनमध्ये देखील वाढत्या तापमानामुळे राजकीय नेत्यांना संसदेत येताना स्वतःचा सूट उतरवून केवळ शर्ट आणि पँटमध्ये येण्याची मुभा देण्यात आली आहे. स्पेनमध्ये घर आणि कार्यालयांमधील तापमान कमी ठेवण्यासाठी दरवाजे बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.