वार्ताहर / उसगांव
कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्यानंतर तिस्क उसगांव बाजारपेठेसह संपूर्ण पंचायत क्षेत्रात बुधवारी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बुधवार व गुरुवार असे दोन दिवस संपूर्ण पंचायत क्षेत्रात लॉकडाऊनचे आवाहन उसगाव-गांजे पंचायतीने केले होते. व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेऊन व नागरिकांनी घरीच थांबून या लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद दिला.
केवळ दूध पुरवठा व औषधालये या अत्यावश्यक सेवा सोडल्यास इतर सर्व व्यवहार बंद होते. एरवी लोकांचा वावर असणाऱया तिस्क उसगाव येथील पीडीए मार्केट, वडाकडे सर्कल व इतर नाक्यांवर शुकशुकाट पसरला होता. दोन दिवसांच्या या बंदला बुधवारी पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद लाभला. आज गुरुवारी पुन्हा बंद पाळण्यात येणार आहे. या मार्गावरील खासगी प्रवासी बस वाहतूकही सध्या बंद ठेवण्यात आली आहे.
दरम्यान उसगांव भागात सापडलेले दोन्ही कोरोना रुग्ण हे आरोग्य कर्मचारी असून कामाच्या ठिकाणी त्यांना संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खबरदारीचे उपाय म्हणून या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या 42 लोकांचे कोविड नमुने घेण्यात आले होते. या सर्व 42 जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. पुढील काही दिवस त्यांना होम कोरंटाईन करून देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली आहे.