80 ठिकाणी धाडी नुतनीकरण न केलेले 23 वजनकाटे जप्त : वजन माप खात्याची कारवाई
प्रतिनिधी /फोंडा
वजन माप खाते फोंडा विभागातर्फे उसगांव भागात छापा मारून परवाना नुतनीकरणअभावी उपयोगात आणले जाणारे 23 वजनकाटे जप्त केले. यामध्ये स्टेट बॅक ऑफ इंडीया बॅकच्या खांडेपार शाखेतील वजनकाटय़ाचाही समावेश आहे. मागील वर्षभरापासून बॅकेच्या कर्ज वितरणात वापरातील दागिन्याचे वजन याच वजनकाटय़ातून नोंदी करण्यात येत असल्याचे यातून उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार वजन माप खात्यातर्फे दर तीन महिन्यात अशी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक डिकॉस्ता यांनी दिली असून सदर कारवाई दोन दिवसापुर्वी केली होती. उसगांव, तिस्क, बाराजण, मारवासडा, पिळये या भागातून सुमारे 80 विक्रेत्याच्या वजनकाटय़ाची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी सुमारे 23 वजनकाटयाचे नुतनीकरण करण्यात न आल्याचे आढळले. सर्व वजनकाटे फोंडा विभागातर्फे जप्त करण्यात आलेले आहे.
फलोत्पादन, बार, सोनार, बॅक, दुध सोसायटी, भंगारअड्डय़ावर धाडी
सरकारच्या देखरेखेखाली चालणाऱया फलोत्पादन महामंडळाच्या भाजीविक्री केंद्रातील वजनकाटय़ाचे नुतनीकरण केले नसल्याचे आढळले. त्य़ाशिवाय दारू दुकानावरील डबल पेग दारू मोजणी माप, खांडेपार येथील एका नामांकीत उद्योजक अध्यक्ष असलेल्या दुध संकलन करणाऱया दुग्ध सोसायटीचे दुध मोजणी मशिन, किराणा दुकानातील वजनकाटा, भंगारअंडय़ावरील वजनकाटा, चिकन सेंटर, सोन्याचे दागिने तोलण्याचा इलेक्ट्रीक वजनकाटयाचाही समावेश आहे.
ग्राहकांना आपल्या व्यापार खरेदी करताना व्यापाऱयाकडून भुर्दड पडू नये म्हणून सर्व व्यापाऱयांनी वजनकाटय़ाचे नुतनीकरण त्वरीत करावे असे आवाहन निरीक्षक डिकॉस्ता यांनी केले आहे. केवळ वर्षाकाठी जेमतेम रू. 300 ते 500 नुतनीकरण शुल्क आकारण्यात येतो. तसेच मापामध्ये किंवा वजनकाटय़ामध्ये बिघाड असल्यास खात्याकडे असलेल्या तज्ञाकडून दुरूस्ती करण्याची सोयही उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वजन माप खात्याचे अधिकारी प्रसाद शिरोडकर, अरूण पंचवाडकर, देमू मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शुबर्ट डिकॉस्ता यांच्या टिमने ही कारवाई केली.