पाळीहून फोंडय़ाला जाताना उसगावात अपघात : सकाळी कामावर जाताना काळाचा घाला : स्वयंअपघात की हिट ऍन्ड रन? याबाबत गुंता
प्रतिनिधी / फोंडा
वडाकडे-उसगांव येथे डिझेलसाठी बंद पडलेल्या ट्रकजवळ झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. दुचाकीचालक चंद्रकांत थाळी (20, आंबेगाळ पाळी) व त्याच्यामागे बसलेली युवती अलिशा फर्नाडीस (22, सालिथो कॉलनी, आंबेगाळ पाळी) अशी मृताची नावें आहेत. अपघात काल बुधवारी सकाळी 9.15 वा. सुमारास घडला.
फेंडा पोलिसांनी सदर अपघाताची नोंद स्वयंअपघातात अशी केली आहे. उसगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यामागे महामार्गावर जीए 01 यू 3576 हा टिप्पर ट्रक डिझेलसाठी सकाळी 9 वा. बंद पडला होता. सदर ट्रक पाळीहून कोडली तिस्क जाताना वाटेत बंद पडला होता. मयत चंद्रकात एक्टीवा जीए 04 एन 7715 दुचाकीवर पाठिमागे अलिशासह सकाळी फोंडा येथे कामावर जाण्यासाठी निघाला होता. वडाकडे येथे पार्क केलेल्या ट्रकजवळ पोचला असता तो ओव्हरटेक करण्याच्या नादात गेंधळला. यावेळी त्याची निसटती धडक पार्क केलेल्या ट्रकच्या मडगार्डला लागल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अपघातात दुचाकीसह दोघीजण रस्त्यावर कोसळली, युवतीचा जागीच मृत्यू झाला तर युवकाचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. घटनास्थळी अपघातातील दुचाकीने किंचित पेट घेतला होता, पाठीमागून येणाऱया वाहनचालकांने पाण्याचा फवारा मारून तो विझवल्याने पुढील अनर्थ टळला, अशी माहिती पोलिसांनी दिली असून दुचाकीचा स्वयंअपघात झाल्याचे पोलिसांनी तपासाअंती नोंद केली आहे. यासंबंधी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व खाणकंपनीतील जीपीएस ऑपरेटरच्या मदतीने सखोल तपास केल्यानंतर सदर निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली.
आंबेगाळ पाळी परिसरावर शोककळा
मयत चंद्रकांत व अलिशा ही दोघेही आंबेगाळ पाळी येथील असून तिस्क फोंडा येथील एका आस्थापनात कामाला होती. अलिशा ही विमान, रेल्वे बस तिकिट विक्री दुकानात कामाला होती तर चंद्रकांत हा अन्य एका आस्थपनात कामाला आहे. घराकडून कामाला गेलेल्या या दोघाही जणांवर काळाने झडप घातल्याने पाळी भागात शोककळा पसरली आहे. उपनिरीक्षक यशवंत मांद्रकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला आहे.
स्वयं अपघात की हिट ऍन्ड रन?
दुचाकीच्या पाठीमागील भाग व पुढील भागाचा चेंदामेंदा झाल्याने त्यांना पाठिमागून येणाऱया वाहनाची धडक लागल्याचा संशय येथील घटनास्थळी उपस्थित लोकांनी व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे. खाण कंपनीने सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचाही चर्चा सुरू आहे. कोडली तिस्क येथील खाण व्यवसाय सुरू झाल्यामुळे टिप्पर ट्रकांची रेलचेल उसगांव भागात वाढू लागली आहे यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे अशी मागणी केली आहे.
बंद पडलेल्या टिप्पर ट्रकाचा निष्काळजीपणा
टिप्पर ट्रक बंद पडलेल्या अवस्थेत महामार्गावर असल्याने त्याबाबत कोणताही सूचनाफलक नव्हता. बंद पडलेल्या ट्रकाजवळ क्लिनरही उपस्थित नव्हता. त्यामुळे नेमका अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला याबाबत द्विधा परिस्थिती उद्भवलेली आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी मात्र सदर अपघाताची स्वयंअपघात अशी नोंद केली असून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पार्क करून ठेवलेल्या ट्रकचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नावेली अपघातात दुचाकीचालक ठार
प्रतिनिधी / मडगांव
शिर्ली नावेली येथे झलेल्या अपघातात धर्मापूर येथील जासिंतो लुईस हा 58 वर्षीय इसम ठार झाला. या अपघातप्रकरणी कोंब – कुंकळी येथील महम्मद घौस शेख (35) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए-02-टी-4736 क्रमांकाची बस व जीए-01-एल-7051 क्रमांकाची दुचाकी यांच्यात फ्रादेले -नावेली येथे हा अपघात झाला.
या प्रकरणातील संशयित आरोपी महम्मद हा कुंकळीहून मडगावच्या दिशेने बस हाकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे हाकले आणि वरील जागी पोहोचल्यावर विरुद्ध दिशने येत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. मडगावच्या सरकारी इस्पितळात त्याला नेले असता ‘जासिंतो लुईस याला मृतावस्थेत आणले’ असे डय़ुटीवर असलेल्या डॉक्टरांनी टिपण्णी केली.
या अपघाताप्रकरणी मडगाव पोलिसांनी कोंब – कुंकळी येथील महम्मद घौस शेख (35) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 279 तसेच 304-अ कलमाखाली गुन्हा नोंद केला असून मडगावचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्टेन्ली गोम्स या अपघतासंबंधीच्या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.