खुरसाकडे येथे सर्व्हीसरोडवरून महामार्गावर वळविताना अपघात
प्रतिनिधी/ फोंडा
खुरसाकडे उसगांव येथे सर्व्हिसरोडवरून महामार्गावर दुचाकी वळविताना झालेल्या दुचाकी व मिनी टेम्पो यांच्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. विठ्ठल बाबू फोंडे (27,बोळकर्णे-साकोर्डा) असे त्याचे दुचाकीचालकाचे नाव आहे. सदर अपघात मयत विठ्ठल कामावरून सुटून घरी परतीच्या वाटेवर असताना काल गुरूवारी सायंकाळी 6.20 वा. सुमारास घडला. चोवीस तासाच्या आत उसगांव भागातील हा तिसरा अपघाती मृत्यू आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विठ्ठल हा आपली दुचाकी जीए 09 एफ 9871 ने कामावरून सुटल्यानंतर उसगांवमार्गे साकोर्डा येथे जात होता. खांडेपार जुना पूल ओलांडल्यानंतर खुरसाकडील सर्व्हिसरोडवरून महामार्गावर वळविण्याच्या पवित्र्यात असताना हा अपघात घडला. उसगांवहून फोंडामार्गे खांडेपार उड्डानपुलाच्या महामार्गावरून येत असलेल्या टाटा 207 डीआय जीए 05 सी 0230 या टेम्पोला दुचाकीची निसटती धडक बसली. दुचाकीचालक रस्त्याव फेकला गेला व गंभीर जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत पिळय़े धारबांदोडा येथील उप आरोग्य केंद्रातील हलविण्यात आले असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर अधिक तपास करीत आहे.
मयत विठ्ठल हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा तरूण होता. तो आईवडीलांचा एकुलता मुलगा असून दोन वर्षापुर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात आई , वडील, पत्नी व दोन वर्षाची व सहा महिन्याची अशी दोन लहान मुले आहेत. दोन वर्षापुर्वी सरकारी कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून कामाला लागला होता. सद्या मडगांव येथे कामाला होता. त्याचे जीवन रूळावर येत असताना काळाने प्रुर झडप घातली त्यामुळे बाळकर्णे भागात शोककळा पसरली आहे.