ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसअखेर 3 बाद 251
वृत्तसंस्था/ कराची
उस्मान ख्वाजाच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने शनिवारपासून येथे सुरू झालेल्या यजमान पाकविरूद्ध दुसऱया कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर पहिल्या डावात 3 बाद 251 धावा जमविल्या. ख्वाजा 127 धावांवर खेळत असून स्टीव्ह स्मिथने 72 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दुसऱया कसोटीसाठी पाक संघाने दोन बदल केले. साजिद खान आणि नौमन अली यांचे संघातील स्थान कायम राहिले. हसन, अश्रफ यांचे पुनरागमन झाले.
उभय संघातील झालेल्या पहिल्या कसोटीत हसन-अश्रफ दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. नसिम शहा आणि अष्टपैलू इफ्तिकार अहमद यांना विश्रांती देण्यात आली. ऑस्ट्रेलियन संघात हॅजल वूडच्या जागी फिरकी गोलंदाज स्वेप्सनला संधी देण्यात आली असून त्याने कसोटीत पदार्पण नोंदवले.
या कसोटीत उपाहारापूर्वी पाकच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला सावध सुरूवात करून देताना 18 षटकांत 65 धावांची भागीदारी केली.
पाकच्या फईम अश्रफने ही जोडी फोडताना डेव्हिड वॉर्नरला रिझवानकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 48 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस आलेला लाबुसिंघे चोरटी धाव घेण्याच्या नादात खाते उघडण्यापूर्वी साजिद खानच्या अचूक फेकीवर धावचीत झाला. ऑस्ट्रेलियाची स्थिती यावेळी 21 षटकांत 2 बाद 91 अशी होती. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 100 धावा जमविल्या होत्या.
उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 159 धावांची भागीदारी केली. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 172 धावापर्यंत मजल मारली होती. रावळपिंडी पहिल्या कसोटीत केवळ तीन धावांनी शतक हुकलेल्या उस्मान ख्वाजाने या दुसऱया कसोटीत आक्रमक आणि तंत्रशुद्ध फलंदाजी केली.
चहापानानंतर पाकच्या हसन अलीने स्टीव्ह स्मिथला अश्रफकरवी झेलबाद केले. त्याने 214 चेंडूत 7 चौकारांसह 72 धावा झळकविल्या. ख्वाजाने 266 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकार ठोकले. तो दिवसअखेर 127 धावांवर खेळत असून नाईट वॉचमन नॅथन लियॉनने आपले खाते उघडलेले नाही. पाकच्या तीन वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला बऱयापैकी लगाम घातला. चहापानापूर्वी शेवटच्या 12 षटकांत ख्वाजा आणि स्मिथ या जोडीने केवळ 15 धावा जमविल्या होत्या. पाकतर्फे अश्रफ आणि हसन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियन संघ तब्बल 24 वर्षांनंतर पाकमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत रावळपिंडीची पहिली कसोटी अनिर्णित राहिली आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 90 षटकात 3 बाद 251 (उस्मान ख्वाजा खेळत आहे 127, वॉर्नर 36, लाबुसिंघे 0, स्टीव्ह स्मिथ 72, लियॉन खेळत आहे 0, हसन अली 1-31, अश्रफ 1-32).