आटपाडी / प्रतिनिधी
राज्यातील ऊसतोड मजुर, वाहतुकदार, मुकादम यांच्या मागण्यांकडे कारखानदारांसह सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या मागण्या मान्य होईपर्यंत २०२०-२१ या हंगामासाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यासाठी बुधवारी ढालगाव, संख, कोळा आणि झरे येथे माजी मंत्री सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड मजुर, मुकादम व वाहतुकदारांच्या बैठका आयोजित केल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
आटपाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड मजुर, मुकादम व वाहतुकदार संघटना, महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी मजुर संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपासह ऊसतोडणीवरील बहिष्काराची माहिती दिली. जि.प.अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष पप्पु डोंगरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, तानाजीशेठ यमगर, विष्णु अर्जुन, जयवंत सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील ऊसतोडणीच्या दरवाढीचा करार २०१९-२० मध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे ऊसतोडणी मजूर मुकादम वाहतूक संघटनांसह सर्व ऊस तोडणी संघटनांनी एकत्र येवून हंगाम २०२०- २१पासुन दरवाढीचा संप करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत एकही ऊसतोड कामगार मजुर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी जाणार नसल्याचा निर्धार माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे
उसतोडणी वाहतूक दरात १५० टक्के वाढ करावी, मकादमाच्या कमिशनमध्ये ३७टक्के वाढ करावी, प्रत्येक कारखान्याला १०० टक्के शौचालाय असल्याशिवाय गाळप परवाना देवू नये, उसतोड मजुर व बैलांचा संपूर्ण विमा कारखान्याने भरावा यासह अन्य मागण्यांसाठी करार होईपर्यंत संप राहणार आहे. हा संप यशस्वी करण्यासह उसतोड मजुर, मुकादम, वाहतुकदारांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. – कवठेमहंकाळ तालुक्यातील ढालगाव येथे सकाळी सव्वा अकरा वाजता संजय मंगल कार्यालय, सव्वा एक वाजता जत तालुक्यातील संख येथे तुकाराम बागडे महाराज मठ, सव्वातीन वाजता सांगोला तालुक्यातील कोळा येथे तुळशी हॉलमध्ये, सव्वा पाच वाजता आटपाडी तालुक्यातील झरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गेस्ट हाउस येथे ऊसतोड मजुर, मुकादम् , वाहतुकदारांची व्यापक बैठक होणार आहे या बैठकीत राज्यव्यापी संप आणि मागण्यांबाबत माजी मंत्री सुरेश धस मार्गदर्शन करणार आहेत, असेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.