वाई तालुक्यातील घटना : टोळी मुकादमाचे पैसे फेडण्याची विवंचना
प्रतिनिधी/ सातारा
अनलॉकनंतर कसे तरी ऊसतोडीचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, टोळी मुकादमाकडून पैशांची उचल घेवून नंतर कामाचा कंटाळा आल्याने मुलगा अचानक गावाकडे निघून गेला. मग आता ऊसतोड टोळीच्या मुकादमाकडून मुलाने घेतलेले उसने पैसे कसे फेडायचे, या विवंचनेतून आईने विषारी औषध प्राशन केल्याची घटना खोलवडी, ता. वाई येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शांताबाई विश्वनाथ गरुड (वय 40, मूळ रा. शेवगाव, जि. अहमदनगर सध्या रा. खोळवडी, ता. वाई) ही महिला आपला पती व मुलगा अभिषेक यांच्यासमवेत ऊसतोड टोळीमध्ये काम करते. सध्या वाई तालुक्यात हे कुटुंब ऊसतोडीचे काम करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा अभिषेक याने ऊसतोडी टोळी मुकदमाकडून उचल पोटी काही रक्कम घेतली होती.
त्यानंतर कामाचा कंटाळा आल्यामुळे मुलगा अभिषेक गावाला निघून गेला. मात्र, त्यामुळे आई शांताबाई गरुड यांनी ऊस तोडी मुकादमाचे घेतलेले पैसे परत कसे करायचे या विवंचनेतून शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर त्यांना त्रास सुरु झाल्याने मग उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.