शिराळा / वार्ताहर
तडवळे (ता.शिराळा) येथे सलग दुसऱ्या वर्षी ऊसतोड मजूर कामगाराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली. गणेश श्रीराम कांबिलकर रा.मानखुरवाडी, जिल्हा बिड (वय ५ ) याच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. सदर घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तडवळे येथे घडली. गेल्या वर्षी याच पध्दतीने २२ फेब्रुवारी २०२१ रोजी ऊसतोड मजुराच्या लहान सौफियान शमसुद्दीन शेख (वय ३) या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने या मुलाचा जिव गेला होता. तर शिराळा शहराच्यानजीकच काही दिवसांपासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. शहराच्या हद्दीत व नजिकच्या गावातील अनेक शेळ्या मेंढ्यांसह शेकडो कुत्र्यांना बिबट्यांनी आपले भक्ष बनवले आहे. त्यामुळे शिराळा शहरासह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
घटना स्थळावरुन समजलेली माहिती अशी, सायंकाळच्या साडे सहाच्या वाजण्याच्या सुमारास ऊस मालक शिवाजी तुकाराम पाटील रा. तडवळे यांच्या शेतात दिवसभर ऊसतोड मजूर ऊसतोडणी करत होते. सायंकाळच्या सुमारास ऊस तोड केलेला ऊस ट्रॅक्टर मध्ये भरण्याचे काम सर्व महिला व पुरुष ऊसतोड मजूर करत होते. यावेळी गणेश हा ट्रॅक्टरच्या तोंडाजवळ पुढील बाजूस बसलेला होता. गणेश यांच्यावर बिबट्यांने अचानक झडप घातली. त्यास घेऊन जात असताना दुर्गा दुरंदरे ऊसतोड महिलेने पाहिले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी समोर मोठी दरडी असल्याने दरडीवरून जात असताना बिबट्यांने गणेशला सोडून तिथून पळ काढला. ऊस मजुर कामगारांनी व ग्रामस्थांनी बालकास जखमी अवस्थेत शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ.गणेश राजमाने यांनी प्राथमिक उपचार करून बालकास सांगली येथे पुढील उपचारासाठी पाठवले